Gujarat Narmada Vidyalay : भरूच (गुजरात) येथील एका शाळेत चाचणी परीक्षेतील काही प्रश्‍न इस्लामच्या संदर्भात !

हिंदु पालकांचा विरोध

भरूच (गुजरात) – येथील जी.एन्.एफ्.सी. नर्मदा विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेमध्ये इस्लामशी संबंधित प्रश्‍न विचारल्याची घटना समोर आली आहे. या शाळेत ७ ऑगस्ट या दिवशी चाचणी परीक्षा झाली. या परीक्षेतील सदर वादग्रस्त प्रश्‍नपत्रिका सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली. याला हिंदु पालकांनी विरोध केला आहे. हा प्रकार पाहून काही लोकांनी, ‘ही शाळा भारतात आहे कि पाकिस्तानात ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

१. एकात वाक्यात रिक्त जागा भरायची होती. हे वाक्य ‘देवाची इच्छा असेल, तर प्रत्येक जण (…) पळून जाऊ शकतो’. असे होते. याच्या उत्तरातील पर्यायांमध्ये ‘किस्मत (नशीबानुसार), मन्नत (इच्छेनुसार), दावत (मेजवानीसाठी) आणि आफत (संकटामुळे)’, असे शब्द दिले होते.

२. अन्य एका प्रश्‍नात ‘ईदच्या नमाजासाठीच्या ठिकाणाचे नाव काय आहे ?’, असे विचारले होते. यास ‘इदबाग, इदमेदान, इदघर आणि ईदगाह’, असे पर्याय देण्यात आले होते. जेव्हा मुलांनी ही प्रश्‍नपत्रिका त्यांच्या घरी दाखवली गेली, तेव्हा पालकांनी त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांत प्रसारित करत मुलांना असे प्रश्‍न विचारल्याचा निषेध केला.

केवळ सरकारी पाठ्यपुस्तकातूनच घेण्यात आले प्रश्‍न ! – शाळेच्या व्यवस्थापनाचा दावा

शाळेच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, हे प्रश्‍न केवळ सरकारी पाठ्यपुस्तकातून घेण्यात आले असून विषयाबाहेरील कोणताही प्रश्‍न विचारण्यात आलेला नाही. यामागे शाळा किंवा शिक्षक यांचा अन्य कुठलाही हेतू नव्हता. याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयालाही उत्तर सादर करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

गुजरातमध्ये अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना असे घडू नये, असेच हिंदूंना वाटते !