समस्त हिंदु धर्म संघटनांच्या वतीने १२ ऑगस्टला ‘श्रावण व्रत वैकल्य उपक्रमा’चे आयोजन !

(चित्रावर क्लिक करा)

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदु धर्म संघटना आणि ‘राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’च्या वतीने हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या श्रावण मासाच्या निमित्त श्रावण मासाच्या दुसर्‍या सोमवारी म्हणजेच १२ ऑगस्टला सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत नष्टे लॉन, महावीर गार्डनजवळ येथे ‘श्रावण व्रत-वैकल्य उपक्रमा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर

१. हिंदु धर्मातील सणांची माहिती सर्वांना व्हावी, हिंदु धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, याकरिता गेल्या १० वर्षांपासून समस्त हिंदु धर्म संघटनेच्या वतीने श्रावण व्रत-वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

२. या उपक्रमात श्री. कमलाकर किलकिले सकाळी पंचगंगा नदीतून कावडीने पाणी आणणार आहेत. या पवित्र जलाने श्री महादेवाची पिंड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस जलाभिषेक करण्यात येईल. यानंतर गोमातापूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होणार आहे. यानंतर ११ नवदांपत्यांच्या उपस्थितीत यज्ञास प्रारंभ होणार आहे. याचे पौरोहित्य श्री. सुहास जोशीगुरुजी करणार आहेत. यानंतर हिंदु देवतांचे पूजन, भारतमातेचे पूजन करण्यात येईल. १०८ दांपत्य केळीच्या पानावर मंत्रघोषित सात्त्विक भोजनाद्वारे उपवास सोडतील.

३. कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृती असणार आहेत. त्याचसमवेत भोजन मंडपामध्ये हिंदु धर्माचे मार्गदर्शनपर बोधवाक्यांचे फलक लावण्यात येणार आहेत. तरी हिंदु धर्माचा वारसा जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदु नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु धर्म संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.