स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा ! – कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनास निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !

तहसीलदार स्वप्नील पवार (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, १० ऑगस्ट (वार्ता.) – राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारले. (असे निवेदन का द्यावे लागते ? – संपादक)

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. अर्जुन आंबी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे आणि श्री. विकास जाधव, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, प्रीतम पवार, बाबासाहेब भोपळे आणि दीपक कातवरे उपस्थित होते.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

१. शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी.

२. जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन अथवा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी.

३. सर्वच शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत.