१४ जणांना रशियाने सोडले, तर उर्वरित ६९ अद्याप रशियात !
नवी देहली – रशियाच्या सैन्यात एकूण ९१ भारतीय भरती झाले असून त्यांपैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १४ जणांना रशियाने माघारी पाठवले आहे. यांतील काही भारतात पोचले आहेत, तर काही जण येण्याच्या प्रक्रियेत आहेत. सरकारला अद्यापही ६९ भारतियांच्या सुटकेची प्रतीक्षा आहे, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी लोकसभेत एम्.आय.एम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.
१. ओवैसी यांनी पुढे असेही विचारले होते की, भारतियांना धोका देऊन त्यांना रशियाला पाठवणार्या आरोपींविरुद्ध काय कारवाई होत आहे ? रशियाचे सैन्य भारतियांना परत पाठवत नसेल, तर भारत या प्रकरणाचा विरोध करेल का ?
२. या प्रश्नांवर उत्तर देतांना डॉ. जयशंकर म्हणाले की, अनेक प्रकरणांत असे संकेत मिळाले आहेत की, भारतीय नागरिकांची रशियाच्या सैन्यात भरती होण्यासाठी दिशाभूल करण्यात आली होती. सीबीआयने भारतियांना विदेशात पाठवण्याच्या प्रकरणात १९ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणात मानवी तस्करीचे पुरावेही समोर आले आहेत.