भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी महंमद युनूस यांना त्यांच्या विधानावरून अप्रत्यक्षरित्या सुनावले !

नवी देहली – बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी ‘बिमस्टेक’प्रती असलेल्या दायित्वाची भारताला जाणीव आहे. शेवटी बंगालच्या उपसागराला अंदाजे ६ सहस्र ५०० कि.मी. इतकी सर्वाधिक लांब किनारपट्टीदेखील आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते थायलंडमधील सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेला संबोधित करतांना बोलत होते.
काही दिवसांपूर्वी महंमद युनूस यांनी चीनच्या दौर्यावर ईशान्य भारताला चारही बाजूंनी भूमीने वेढलेला असून त्याला समुद्रापर्यंत पोचण्यासाठी आमच्या माध्यमांतून जावे लागते, असे विधान केले होते. त्यावर जयशंकर यांनी वरील विधानातून भारताकडे किती लांब समुद्र किनारपट्टी आहे ?, हे सांगितले.
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, बांगलादेशाचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस आदी उपस्थित आहेत. महंमद युनूस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेगळी भेट मागितली आहे; परंतु भारताने अद्याप भेटीविषयी संमती दिलेली नाही.
परराष्ट्रमंत्री एस् जयशंकर पुढे म्हणाले की,
१. बंगालच्या उपसागरात आमच्याकडे अनुमाने ६ सहस्र ५०० कि.मी.चा सर्वांत लांब किनारा आहे. आमचा ईशान्य प्रदेश रस्ते, रेल्वे, जलमार्ग, वीजवाहिनी आणि जलवाहिनी यांच्या असंख्य जाळ्यासह बिमस्टेकसाठी संपर्क केंद्र म्हणून उदयास येत आहे.
२. त्रिपक्षीय महामार्ग पूर्ण झाल्यामुळे भारताचा ईशान्य भाग प्रशांत महासागराशी जोडला जाईल, जो खरोखरच एक महत्त्वाचा टप्पा आहे.
३. या मोठ्या भूगोलात वस्तू, सेवा आणि लोकांच्या सुरळीत प्रवाहासाठी आमचे सहकार्य अन् सुविधा ही एक आवश्यक अट आहे, याची आम्हाला जाणीव आहे. हे भू-सामरिक घटक लक्षात घेऊन आम्ही गेल्या दशकात बिमस्टेकला बळकटी देत आहोत.
४. भारताचा असा विश्वास आहे की, सहकार्य हा एकात्मिक दृष्टीकोन आहे आणि एकापेक्षा एक निवडण्याची गोष्ट नाही.