व्यापारी संघटनेत फूट पाडण्याचा केला जात आहे प्रयत्न; मात्र चिपळूण व्यापारी महासंघटना अभेद्य !

[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]
  • उरण आणि चिपळूण येथील घटनेची दखल घेत व्यापार्‍यांनी सर्वानुमते पाळला होता कडकडीत बंद !

  • व्यापारी महासंघटनेच्या बैठकीत फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा निषेध

  • व्यापार्‍यांविषयी अनुद्गार काढल्यास रस्त्यावर उतरणार !

 चिपळूण येथे झालेल्या बैठकीत उपस्थित व्यापारी

चिपळूण – उरण येथील कु. यशश्री शिंदेची हत्या आणि चिपळूण येथील आंदोलनात घुसलेल्या महिलेने शिवीगाळ केलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापार्‍यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीत चिपळूण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला होता. या निर्णयानुसार सर्वांनी कडकडीत बंद पाळून व्यापारी एकजुटीचा प्रत्ययही दिला होता.
असे असतांनाही दुसर्‍या दिवशी ३ ऑगस्टला मात्र या बंदमागील प्रक्रियेची कुठलीही माहिती न घेता व्यापारांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. सुरळीत चालू झालेल्या बाजारपेठेला पुन्हा एकदा राजकीय हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही माजी पदाधिकार्‍यांनी येथील वातावरण ढवळून काढायचे केविलवाणे काम चालू केले आहे. यात संपूर्ण व्यापारी महासंघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांच्यावर माजी पदाधिकार्‍यांनी कपोलकल्पित मुक्ताफळे उधळली आहेत आणि बैठकीस उपस्थित न रहाता, कुणी बाहेरून येण्याचा वगैरे धमकीवजा शब्दप्रयोग करण्याचा जो प्रयत्न केला आहे. त्याचा संपूर्ण चिपळूण तालुका व्यापारी महासंघटना तीव्र भाषेत निषेध करत आहे. तसेच पुन्हा अशा तथाकथित लोकांनी व्यापारी बांधवांविषयी अनुद्गार काढल्यास त्याच्या विरोधात स्वतः सर्व व्यापारीबांधव रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पहाणार नाहीत, अशी चेतावणी ७ ऑगस्टला प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत देण्यात आली.

आम्हाला तोंड उघडायला लावू नका !

कोणत्या तरी कमिटीचे दाखले देण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न केल्यास फूट पाडणार्‍यांनी ३० वर्षांत काय काय दिवे लावले ? याचा ज्येष्ठ व्यापारी लेखाजोखा मांडतील. त्यामुळे ‘‘आम्हास कृपया तोंड उघडायला लावू नका.’’, असेही या बैठकीत सांगण्यात आले.

व्यापारी महासंघटनेने घेतलेला निर्णय हा सर्वानुमते चिपळूण तालुक्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे. व्यापारी महासंघटना ही वज्रासारखी अभेद्य असून यात कोणतीही फूट पडलेली नाही. हे कुणाचे तरी दिवास्वप्न असून ते कदापि यशस्वी होणार नाही, हे झालेल्या दोन्ही बैठका, बंद आणि व्यापारी निषेध मोर्चा यावरून दिसून येते. ‘डोळ्यांत अंजन घालणारे’ हे व्यापारी एकीचे उदाहरण आहे.

बैठकीला उपस्थित व्यापारी

या बैठकीला उपस्थित असलेले चिपळूण व्यापारी महासंघटना अध्यक्ष किशोर रेडिज, कार्याध्यक्ष कांता चिपळूणकर, सचिव उदय ओतारी, सल्लागार बापू काणे, ज्येष्ठ व्यापारी रामशेठ रेडीज, उपाध्यक्ष दिलीप हरवंदे, खजिनदार शैलेश सावंत, सह सेक्रेटरी सौरभ मिरलेकर, उपाध्यक्षा सौ. मीनल आंब्रे, उपाध्यक्षा सौ. प्रणिता धामणस्कर, उपाध्यक्ष इम्रान खतीब, उपाध्यक्ष वासुदेव भांबुरे, शादाबभाई फजलानी, अस्लम मेमन, मोहन शेलार, विजय शेठ रतावा, भूषण ओसवाल, बाबू चीखले, शैलेश वरवाटकर, मंदार ओक, विजय चितळे, श्रीनाथ खेडेकर, भैया उपाख्य प्रथमेश कापडी, राजेंद्र सावंत, वासुदेव भांबुरे, पांडुरंग फडतरे, यांसमवेत व्यापारी महासंघटनेचे सर्व व्यापारी बांधवांनी यास संपूर्ण पाठिंबा दर्शवलेला आहे.

काय घडले होते ?   

  • १ ऑगस्टला यशश्री शिंदेच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आंदोलनकर्ते न्यायाची मागणी करत असतांना एक महिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मोर्चात शिरली. याचे तीव्र पडसाद शहरभर उमटायला लागले.
  •  जनतेने आवाहन केल्यानुसार परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि तातडीने कोणताही निर्णय न घेता हे प्रकरण अधिक चिघळू नये; म्हणून व्यापार्‍यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. २०० व्यापार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महिलेच्या कृत्याचा निषेध म्हणून आणि अधिक दुष्परिणाम टाळण्याच्या हेतूने बंद घ्यायचा का ? यावर सर्व व्यापार्‍यांना स्पष्ट मते मांडण्यास सांगितले.
  • या वेळी सर्वांनी आपापली मते मांडून ‘व्यापारी संघटना जो निर्णय घेईल, तो आम्हास मान्य आहे’, असे सांगितले.
  •  ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ यानुसार काहींची वेगवेगळी मते होती; परंतु दीड तासाच्या एकत्रित चर्चेनंतर सर्व मागण्यांचा विचार करून बहुमताने ठरलेला २ ऑगस्टला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया कुणाच्याही एकांगी विचाराने झालेली नव्हती.
  • दुसर्‍या दिवशी मोर्चामध्येही सर्वधर्मीय व्यापारी बांधवांची एकजूट दिसून आली.
[WPI_DISPLAY_SHARE_ICONS]