Anti Conversion Law Arrest : उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत १ सहस्र ६८२ जणांना अटक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशामध्‍ये धर्मांतरविरोधी कायद्याच्‍या अंतर्गत आतापर्यंत १ सहस्र ६८२ जणांना अटक करण्‍यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत या कायद्यांतर्गत ८३५ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत. पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्‍हणाले की, वर्ष २०२० मध्‍ये लागू झालेल्‍या या कायद्याच्‍या अंतर्गत आतापर्यंत २ सहस्र ७०८ लोकांना ओळखण्‍यात आले आहे. यातील पसार असणार्‍यांचा शोध घेतला जात आहे.

प्रशांत कुमार म्‍हणाले की,

१. एकूण ९८ टक्‍के म्‍हणजे ८१८ प्रकरणांमध्‍ये आरोपपत्र प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आले आहे, तर १७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. आमीष दाखवणे, धमकी देणे किंवा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने धर्मांतराला प्रवृत्त करणार्‍यांना सोडले जाणार नाही.

२. १२४ लोकांची इतरांचे धर्मांतर करण्‍यात कोणतीही भूमिका नसल्‍याचे आढळून आल्‍याने त्‍यांना सोडून देण्‍यात आले आहे. अन्‍य ७० जणांनी न्‍यायालयात शरणागती पत्‍करली आहे.

संपादकीय भूमिका

लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करून संबंधितांवर कारवाई करूनही उत्तरप्रदेशात लव्‍ह जिहादच्‍या घटना थांबलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे अशांना जन्‍मठेप नाही, तर फाशीचीच शिक्षा करण्‍याचा पालट कायद्यात केला पाहिजे !