प्रभु श्रीरामचंद्रांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेले कोल्‍हापूर येथील रावणेश्‍वर मंदिर !

श्रावण मासाच्‍या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’ची विशेष लेखमाला..

महाराष्‍ट्रात आणि भारतात काही हिंदु मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे धार्मिक अन् आध्‍यात्मिक दृष्‍ट्या संपन्‍न असली, तरी ती विशेष प्रसिद्ध नसल्‍याने भाविकांना त्‍यांची माहिती नाही. श्रावण मासाच्‍या या लेखमालेच्‍या निमित्ताने आमच्‍या वाचकांना मंदिरांची ओळख करून देण्‍याचा हा प्रयत्न !

रावणेश्‍वर मंदिर

प्रभु श्रीरामाकडून २ लिंगांची स्‍थापना !

प्रभु श्रीरामचंद्र वनवासात असतांना ते लक्ष्मण-सीतामाता यांच्‍यासह करवीर (कोल्‍हापूर) क्षेत्री आले. त्‍या वेळी दशरथ राजाला पिंडदान करण्‍याची वेळ आली असता अन्‍य काही साधन न मिळाल्‍याने सीतामातेने वाळूचे पिंड करून ते जवळच असलेल्‍या जयंती नदीत प्रवाहित केले. माता सीतेचा श्रद्धाभाव आणि करवीर क्षेत्राच्‍या प्रभावामुळे दशरथ राजा तृप्‍त होऊन मोक्षास गेला. वास्‍तविक पिंडदानाचा अधिकार हा पुत्राचा असतो आणि मृत व्‍यक्‍तीचा पिंड हा सातूच्‍या पिठाचा किंवा भाताचा हवा, असे आहे. असे असतांना एका सुनेच्‍या हातून वाळूच्‍या पिंडदानाने सासर्‍याला मोक्ष मिळणे, ही गोष्‍ट करवीर क्षेत्राचे माहात्‍म्‍य स्‍पष्‍ट करते. हे माहात्‍म्‍य लक्षात घेऊन प्रभु श्रीरामचंद्र यांनी येथील तीर्थाच्‍या काठावर त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या नावाचे आणि लक्ष्मणाने त्‍यांच्‍या नावे अशी दोन शिवलिंगे स्‍थापन केली.

रावणेश्‍वर मंदिरात असलेली भगवान शिवाची पिंड
मंदिरात प्रभु श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि माता सीता यांचे शिल्‍प आहे, तसेच अमरनाथ गुहेचे स्‍वरूप असलेले शिवलिंग आहे.

सध्‍या रावणेश्‍वर मंदिराच्‍या गाभार्‍यात जे लिंग आहे, ते रामेश्‍वर लिंग, तर मंदिराच्‍या आवारात जे लिंग आहे, ते लक्ष्मणेश्‍वर लिंग होय. येथील तीर्थाला (तळ्‍याला) ‘सीता तीर्थ’ म्‍हणून ओळखले जाते. काळाच्‍या ओघात येथे असणार्‍या तळ्‍याला रावणेश्‍वर असे म्‍हटले जाऊ लागले आणि पुढे या तळ्‍याच्‍या काठी असलेल्‍या रामेश्‍वरालाच लोक रावणेश्‍वर म्‍हणू लागले. हे मंदिर शाहू स्‍टेडियमच्‍या शेजारी मंगळवार पेठ, कोल्‍हापूर येथे आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार !

आरंभी साध्‍या लोखंडी छत्रीखाली असणार्‍या देवालयाचा जीर्णोद्धार वर्ष १९९४ मध्‍ये झाला आणि शिवलिंगाच्‍या आकाराचे नवे मंदिर बांधण्‍यात आले. वर्ष २०१३ मध्‍ये शिखर चढवण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आणि कर्नाटकातील एका शिल्‍पकाराच्‍या हातून ती साकारून घेण्‍यात आली.

मंदिरात प्रवेश करण्‍यापूर्वी प्रवेशद्वारावर श्री शिवशंकराची ध्‍यानस्‍थ मूर्ती पहायला मिळते. नंदी आणि मोर यांच्‍या शिल्‍पांनी अलंकृत अशा प्रवेशद्वारातून आत आल्‍यावर मंदिराच्‍या संरक्षक भिंतीवर १२ ज्‍योतिर्लिंगांची शिल्‍पे पहावयास मिळतात. नंदी, श्रृंगी, भृंगी, वीरभद्र, भैरव हे शिवगण, तर गंगा-गौरी या शिवाच्‍या शक्‍ती अशी कैलासाची प्रतिमादुजी ही उक्‍ती सार्थ करणार्‍या पद्धतीची रचना या मंदिरात करण्‍यात आली आहे. या मंदिराचे विशेष म्‍हणजे शिवनिर्माल्‍य कुठेही ओलांडले जात नाही. येथे श्री लिंगाजवळ चंडेश गणाची स्‍थापना केली आहे. यामुळे निर्माल्‍य दोष नाहीसा होऊन मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालता येते.

मंदिरातील नैमित्तिक दिनक्रम

मंदिर खुले होण्‍याची वेळ – सकाळी ६ वाजता, पूजा – सकाळी ७, आरती – सकाळी ८.३०, रात्री ८.३०, ‘ॐ नम: शिवाय जप’ रात्री ७.४५ ते ८, रात्री ९ नंतर मुख्‍य गर्भद्वार बंद, तर प्रत्‍येक सोमवारी रुद्राभिषेक