सध्या मथुरा येथील सेवाकेंद्रात रहात असलेले आणि पूर्वी कोची, केरळ येथील सेवाकेंद्रात रहाणारे श्री. श्रीराम लुकतुके यांनी नुकतीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मरणाचा फेरा पार केला. त्या निमित्ताने केरळ येथे रहाणार्या साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सुश्री रश्मी परमेश्वरन् (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४७ वर्षे)
१ अ. भावपूर्ण आणि परिपूर्ण रीतीने संतसेवा करणे : ‘कोची, केरळ येथील सेवाकेंद्रात कुणी संत आले, तर ‘त्यांची सेवा कशी करायची ? त्यांच्यासाठी खोली कशी सिद्ध करायची ? किंवा त्यांच्यासाठी भोजन कसे बनवायचे ?’, हे सर्व आम्हाला दादांकडून शिकायला मिळाले. दादा पुष्कळ भावपूर्ण आणि परिपूर्ण रीतीने या सेवा करायचे.
१ आ. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणे : श्रीरामदादांमध्ये पुष्कळ प्रेमभाव असल्यामुळे ते साधकांना साहाय्य करण्यास नेहमी तत्पर असतात. कुणी साधक आजारी पडले, किंवा त्यांना बाहेर कुठे सोडायचे असेल, तर दादा ही सेवा करण्यास नेहमी सिद्ध असतात. केरळमध्ये कुठे दूरच्या ठिकाणी संपर्काला जायचे असले, तरी दादांची त्यासाठी सिद्धता असे.
१ इ. त्यागी वृत्ती आणि स्वतःला पालटण्याची तळमळ : दादांनी पूर्णकालीन साधना करण्याचे निश्चित केले आणि ते देहली येथील सेवाकेंद्रात राहून सेवा करू लागले. तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगा यांनी मात्र केरळ सेवाकेंद्रात रहाण्याचे ठरवले. हा त्यांच्या परिवाराचा पुष्कळ मोठा त्याग आहे. दादा आणि त्यांची पत्नी दोघेही तळमळीने साधना करत आहेत. त्या दोघांनाही स्वतःला पालटण्याची तळमळ आहे.
१ ई. प्रामाणिकपणा आणि चुकीविषयीचे गांभीर्य : श्रीरामदादा अतिशय प्रामाणिक आहेत. काही वर्षांपूर्वी एका चुकीच्या कृतीविषयी ‘कोणकोणत्या साधकांकडून अशी चूक झाली आहे ?’, असे विचारण्यात आले होते. तेव्हा दादांनी लगेचच स्वत:ची चूक लिहून पाठवली होती.
१ उ. प्रतिकूल प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना शरण जाणे : दादांना कधी संघर्षात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. तेव्हा ते सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना शरण जातात आणि सहसाधकांनाही विचारतात. त्यामुळे संघर्षात्मक प्रसंगांतून त्यांना लवकर बाहेर पडता येते.
प्रार्थना : आता श्रीरामदादांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. ‘त्यांची पुढची प्रगतीही लवकर होऊ दे आणि त्यांना अनेक पटींनी गुरुसेवा करता येऊ दे’,अशी श्री गुरुचरणी प्रार्थना आहे.’ (१२.७.२०२४)
२. कु. अदिती सुखटणकर
२ अ. सेवेची तळमळ
२ अ १. अनेक सेवांत पारंगत असणे : ‘श्रीरामदादा अनेक सेवांत पारंगत आहेत. त्यांना भोजन बनवण्यापासून टंकलेखन, संगणकीय सेवा करणे, संपर्क करणे, जिज्ञासूंपुढे विषय मांडणे इत्यादी सेवा पुष्कळ चांगल्या प्रकारे येतात.
२ अ २. प्रत्येक सेवा परिपूर्ण करणे : दादा करत असलेली प्रत्येक सेवा परिपूर्ण असते. एवढेच नाही, तर सेवा करतांना सेवेचे चांगले चिंतन करून आणि पूर्ण बारकावे लक्षात घेऊन दादांनी ती सेवा केलेली असते. एखादी वस्तू हातात धरतांना ‘ती कशी धरायची ? ती अन्य कोठे आपटून खराब होणार नाही ना’, या सर्व गोष्टींकडेही त्यांचे बारीक लक्ष असते.
२ आ. उत्कृष्ट भोजन बनवणे : दादा पुष्कळ उत्कृष्ट भोजन बनवतात. पुष्कळ वर्षांपूर्वी दादा केरळला असतांना प.पू. (कै.) देशपांडेकाका, सद़्गुरु सत्यवान कदम, सद़्गुरु राजेंद्र शिंदे या संतांचे दौरे झाले होते. तेव्हा दादा संतांसाठी प्रसाद आणि महाप्रसाद पुष्कळ चांगल्या पद्धतीने बनवायचे अन् ते व्यवस्थित पद्धतीने वाढायची सेवाही करायचे. ते ही सेवा इतर साधकांनाही शिकवायचे.
२ इ. सद़्गुरु आणि संत यांच्याकडून शिकणे अन् स्वतःच्या कृतीतून इतर साधकांना शिकवणारे श्रीरामदादा ! : दादा कधी केरळ सेवाकेंद्रात येतात. तेव्हा त्यांना सद़्गुरु डॉ. पिंगळे, तसेच इतर संत अन् साधक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे ते आम्हाला सांगतात. ३ – ४ वर्षांपूर्वी दादा केरळला आले असतांना त्यांनी ‘क्षमायाचनेचे महत्त्व’ सांगितले. देहली येथील सेवाकेंद्रात ‘दादा क्षमायाचना कशी करतात ?’, हे सांगून दादांनी साधकांसमोर क्षमायाचना करून दाखवली. त्यामुळे आम्हालाही क्षमायाचना करायची सवय लागली. दादांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला ते शिकवले.
२ ई. आज्ञापालन करणे : दादांचा एक मुख्य गुण आहे, तो म्हणजे आज्ञापालन ! दादा पूर्णवेळ सेवा करू लागल्यावर सेवेनिमित्त काही काळ मुंबई आणि त्यानंतर देहलीला गेले. सेवेनिमित्त बाहेर जाणे, हे दादांनी पूर्णपणे स्वीकारले. दादांची पत्नी आणि मुलगा केरळ सेवाकेंद्रातच असतात. त्या दोघांना भेटायला दादा वर्षातून एकदाच सेवाकेंद्रात येतात; पण येथे आल्यावरही ते सेवारतच असतात.
२ उ. वाढदिवसानिमित्त नवीन संकल्पनांद्वारे शुभेच्छापत्रे आणि चलत्चित्रे बनवणे : दादांनी संत, तसेच साधक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छापत्रे किंवा काही चलत्चित्रे बनवली आहेत. ती पुष्कळ सुरेख असतात आणि ती बघून पुष्कळ आनंद मिळतो. यातून दादांची प्रगल्भता लक्षात येते. दादांना अनेक नवीन संकल्पना सुचतात आणि त्याद्वारे ते संबंधित साधकाला पुष्कळ आनंद देतात.
२ ऊ. श्रीरामदादांमध्ये जाणवलेले पालट
२ ऊ १. सहजता येणे : गेल्या अनेक वर्षांपासून माझी दादांशी ओळख आहे; पण जुलै २०२४ च्या ‘राष्ट्रीय शिबिरा’त दादांची रामनाथी आश्रमामध्ये भेट झाली. तेव्हा मला त्यांच्यात सहजता जाणवली. मागील वर्षी दादा शिबिरात भेटल्यावर विशेष हसायचे नाहीत किंवा स्वतःच्या कोषातच असायचे. यावेळेस तसे न जाणवता त्यांच्यात सहजता जाणवली.
२ ऊ २. ‘दादा पुष्कळ स्थिर आणि भावस्थितीत आहेत’, असे मला जाणवले.
श्रीरामदादांचे हे सर्व गुण देवानेच माझ्या लक्षात आणून दिले, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे गुण मला आत्मसात करता येऊ देत’, अशी मी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करते.’ (१४.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |