|
केपे, ३ ऑगस्ट (वार्ता.) – केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही देणगी कूपने ३ ऑगस्टपासून विक्रीस काढली आहेत. यामध्ये आलीशान सदनिकेसह २० चारचाकी गाड्या आणि कोट्यवधी रुपयांची रोख बक्षिसे ठेवली आहेत. हे देणगी कूपन मिळवण्यासाठी नागरिकांनी ३ ऑगस्ट या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून धो धो पडणार्या पावसाची तमा न बाळगता रांगा लावल्या. केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देणगी कूपन घेण्यासाठी प्रतिवर्ष नागरिकांची गर्दी असते आणि विक्रीला प्रारंभ झाल्यानंतर २ दिवसांत ती संपतात. यंदा मंडळाने दीड लाख देणगी कूपने छापली आहेत आणि प्रत्येक कुपनची किंमत ५०० रुपये आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिवर्ष होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा बोरीमळ, केपे येथील क्रीडा प्रकल्पात कूपन विक्री केली. कूपन विक्रीला ३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला आणि या वेळी बोरीमळ, केपे परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाहतूक नियंत्रण करतांना वाहतूक पोलिसांची बरीच तारांबळ उडाली. लोकांनी कूपन खरेदीसाठी शहरातील ‘ए.टी.एम्.’मधून पैसे काढले आणि यामुळे काही क्षणांतच शहरातील सर्वच ‘ए.टी.एम्.’ यंत्रे रिकामी झाली.
संपादकीय भूमिकायातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते ! लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदूंच्या संघटनासाठी आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या जागृतीसाठी चालू केला होता. याचे आता अशा प्रकारे व्यावसायीकरण होणे अत्यंत दुर्दैवी आहे. |