Pakistani Ex-Ambassador On Haniyeh : हानिया याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा पाकचा दावा !

  • इराण आणि भारत यांच्या मैत्रीत मीठाचा खडा टाकण्याचा पाकचा डाव !

  • पाकिस्तानी पत्रकारानेच पाकला उघडे पाडले !

भारतातील पाकचे माजी राजदूत अब्दुल बासित (डावीकडील) यांचे बिनबुडाचे वक्तव्य !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याला ठार मारल्यानंतर आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. या तणावाच्या वातावरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने भारतातील पाकचे माजी राजदूत अब्दुल बासित यांच्या माध्यमातून भारताला या हत्या प्रकरणात ओढण्यास चालू केले आहे.

अब्दुल बासित यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आरोप केला आहे की, इस्रायलचा पाठिंबा मिळवण्यासाठी तेहरानमध्ये इस्माईल हनिया याच्या हत्येच्या प्रकरणी भारताच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चे अनेक छुपे हस्तक (एजंट) इराणमध्ये आहेत. आपण सर्वांनी कमांडर कुलभूषण जाधव (कथित हेरगिरीच्या प्रकरणी पाकने जाधव यांना अटक केली आहे.) यांची आठवण ठेवली पाहिजे.

बासित यांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेत रहाणारे पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी बासित यांना उघडे पाडले आहे.

पत्रकार वजाहत यांनी सांगितले की,

१. बासित आय.एस्.आय.च्या निर्देशानुसार काम करतात. आय.एस्.आय.च्या सांगण्यावरून बासित यांनी भारताविषयीचे सूत्र उपस्थित केले आहे. हे बालीश विधान असून इस्रायलने हानिया याच्यावर आक्रमण केले, हे वास्तव आहे.

२. पाकिस्ताननेही भारताचे शत्रू असलेल्या अनेकांना आश्रय दिला आहे. यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल यांच्या आतंकवादी नेत्यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये असे २० लोक मारले गेले असून यासाठीही भारताला उत्तरदायी धरले जात आहे.

३. भारतीय सैन्य जम्मूमध्ये मोठी सिद्धता करत असून आतंकवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करणार आहे.

४. पाकिस्तान इराणच्या रणनीतीचे अनुकरण करत असून अनेक आतंकवादी गटांना पाठिंबा देत आहे. इराणचे अनेक शिया गट पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत. पाकिस्तानने आता त्यांना लक्ष्य केले आहे. इराणची गुप्तचर संस्था पाकिस्तानी शिया तरुणांची भरती करते. आता पाकिस्तान इराणविरोधातील सौदी गटात सहभागी होणार कि नाही ?, हे पहायचे आहे.

नरेंद्र मोदींसोबत इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी.

५. भारत आणि इराण यांच्यातील मैत्री वाढत असतांना आय.एस्.आय.च्या या हस्तकाने (बासित यांनी) हा आरोप केला आहे. भारत इराणमधील चाबहार येथे बंदर बांधत आहे. ते पाकच्या ग्वादर बंदराला उत्तर मानले जाते. यामुळे पाकिस्तान चिडला आहे. भारताची इस्रायलशी घनिष्ठ मैत्री आहे.

संपादकीय भूमिका

पाकने कितीही आरोप केले, तरी जगाला सत्य काय ते ठाऊक आहे. उलट अशा दाव्यांमुळे पाकचेच जगभरात हसे होत आहे !