चेन्नई – श्रीलंका नौदलाची नौका धडकल्याने भारतीय मासेमाराची नौका उलटली. या अपघातात एका भारतीय मासेमाराचा मृत्यू झाला, तर १ मासेमार बेपत्ता आहे. श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना अटक करण्याचा प्रयत्न करत असतांना भारतीय मासेमारांची नौका उलटली. या नौकेमध्ये एकूण ४ मासेमार होते. २ मासेमारांना श्रीलंकेच्या नौदलाने कह्यात घेतले आहे. या अपघातानंतर देहलीतील श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आणि त्यांच्याकडे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
भारत-श्रीलंका संबंधांमध्ये मासेमारांचे सूत्र हे वादग्रस्त सूत्र !
मासेमारांचे सूत्र हे भारत आणि श्रीलंका यांच्यामधील वादग्रस्त सूत्र आहे. मासेमारांशी संबंधित बहुतेक घटना ‘पाल्क स्ट्रेट’मध्ये घडतात. हा तमिळनाडू आणि उत्तर श्रीलंका यांच्यातील एक पट्टा आहे. माशांसाठी ते समृद्ध क्षेत्र मानले जाते. श्रीलंकेने या वर्षात आतापर्यंत १८० हून अधिक मासेमारांना अटक केली आहे. गेल्या वर्षी २४० ते २४५ जणांना अटक करण्यात आली होती.