‘श्रीदेवी नृत्यालया’च्या वतीने पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘३ ते ५.५.२०२४ या कालावधीत पुणे येथे चेन्नई येथील ‘श्रीदेवी नृत्यालय’ या ‘भरतनाट्यम् नृत्य संस्थे’च्या वतीने ३ दिवसांची नृत्य कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या आयोजक श्रीदेवी नृत्यालयाच्या संस्थापिका डॉ. शीला उन्नीकृष्णन् आणि त्यांच्या दोन शिष्या कु. हरिणी जिविथा अन् कु. भैरवी वेंकटेशन् या होत्या. गुरुकृपेने मला त्या कार्यशाळेत सहभागी होण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी भावपूर्ण अर्पण करते.

कु. अपाला औंधकर

१. शिबिरात श्री सरस्वतीदेवीवर आधारित नृत्यरचना शिकतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण होणे आणि विविध दैवी अनुभूती येणे

या कार्यशाळेत शिबिरार्थींना ‘श्री सरस्वतीदेवी’वर आधारित भजनावर नृत्यरचना शिकवण्यात आली. ती रचना शिकतांना आणि त्याचा सराव करतांना मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सतत स्मरण होऊन माझी भावजागृती होत होती. ‘मी प्रत्यक्ष सरस्वती लोकातच आहे’, असे मला वाटत होते. या भजनाच्या प्रारंभी आणि शेवटी वीणावादन होते. ते वीणावादन ऐकतांना मला पुष्कळ हलकेपणा जाणवत होता. या भजनातील ‘ओंकार नादसे नारद गावे’ या ओळीवर नृत्याचा सराव करतांना ‘मला सर्वत्र पांढरा प्रकाश दिसला आणि तो ॐ चा नाद माझ्या शरिरामध्येच आहे’, असे मला जाणवले.

२. शिबिरात सांगितलेली सूत्रे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले  मार्गदर्शन यांत जाणवलेले साम्य

डॉ. शीला उन्नीकृष्णन् यांनी ‘एखाद्या नृत्य कलाकाराची विचारसरणी कशी असायला हवी ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, ‘‘नृत्य सादर करणार्‍याने त्याच्या नृत्याला टाळ्या मिळतील किंवा कुणी चांगले म्हणेल, यासाठी नृत्य करायचे नाही. नृत्य करणार्‍या कलाकाराने सतत शिकत रहायला हवे. त्याच्या शिकण्याला मर्यादा नाही.’’ त्या वेळी मला जाणीव झाली की, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना हीच शिकवण दिली आहे.’ ‘मला देवासाठीच नृत्य करायचे आहे’, हे पुन्हा माझ्या मनावर कोरले गेले.

नृत्यसाधना

३. श्रीविष्णु आणि श्री महालक्ष्मी यांच्या संदर्भातील गीतावर आधारित नृत्य पहातांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती

३ अ. ‘कमल वदनम्, कमल नयनन्’ या गीतावर नृत्य सादर होत असतांना विष्णुलोकाची स्पंदने जाणवणे आणि नृत्य पहातांना देहभान विसरणे : कार्यशाळेच्या तिसर्‍या दिवशी कु. हरिणी जिविथा आणि कु. भैरवी वेंकटेशन् यांनी ‘श्रीनिवास कल्याणम्’ नावाच्या नृत्यनाटिकेमधील ‘श्रीविष्णु अन् श्री महालक्ष्मी’ यांच्या संदर्भातील ‘कमल वदनम्, कमल नयनन्’ या गीतावर नृत्य सादर केले. त्यांचे नृत्य मला जवळून पहाता आले. हे नृत्य चालू झाल्या क्षणी माझ्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वाहू लागले आणि २ – ३ मिनिटे मला विष्णुलोकाची स्पंदने जाणवली. तेव्हा वातावरण विष्णुमय झाले होते. ते नृत्य पहातांना मी देहभान विसरले. त्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाची आठवण येऊन माझा श्रीविष्णुप्रती पुष्कळ भाव जागृत झाला आणि त्या नर्तिकेशी मला एकरूप होता आले. ते शब्दातीत आहे. कु. हरिणी जिविथा आणि कु. भैरवी वेंकटेशन् यांनी २ वेळा हे नृत्य सादर केले. त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला.

३ आ. नृत्य पहातांना ‘गुरुदेवांना अपेक्षित असा साधक कलाकार’ होण्याविषयी चिंतन होणे : हे नृत्य पाहून मला ‘गुरुदेवांना अपेक्षित असा साधक कलाकार कसा असावा ? कलाकार नृत्य करत असतांना त्याला नृत्याशी एकरूपता अनुभवता यायला हवी आणि प्रेक्षकही नृत्याशी एकरूप व्हायला हवेत’, याची जाणीव झाली. त्यांचे नृत्य पहातांना ‘गुरुदेवांना अपेक्षित असा साधक कलाकार कसे व्हायचे ?’, याविषयी माझे चिंतन झाले आणि माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञताही व्यक्त झाली.

४. स्वतः हिंदु संस्कृतीचे पालन करून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार्‍या डॉ. शीला उन्नीकृष्णन् !

डॉ. शीला आणि त्यांच्या शिष्या हिंदु संस्कृतीचे काटेकोरपणे पालन करतात. त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितले, ‘‘भारतीय शास्त्रीय नृत्य करतांना केसांची वेणी घालणे, मध्यभागी भांग पाडणे आणि मोठी टिकली किंवा कुंकू लावणे महत्त्वाचे आहे. लाल रंगाची मोठी टिकली लावावी. काळ्या रंगाची टिकली लावू नये.’’

५. डॉ. शीला उन्नीकृष्णन्, कु. हरिणी जिविथा आणि कु. भैरवी वेंकटेशन् यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य ‘पी.पी.टी.’च्या (टीप) माध्यमातून दाखवणे

(टीप – पी.पी.टी : हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवण्यात येतात.)

५ अ. डॉ. शीला उन्नीकृष्णन्, कु. हरिणी जिविथा आणि कु. भैरवी वेंकटेशन् यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य ‘पी.पी.टी.’च्या माध्यमातून दाखवल्यावर त्यांनी व्यक्त केलेले मनोगत : मी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाचे कार्य ‘पी.पी.टी.’ या प्रणालीद्वारे दाखवले. तेव्हा डॉ. शीला म्हणाल्या, ‘‘कलाकाराने एखादे नृत्य सादर करण्यापूर्वी आणि नृत्य सादर केल्यानंतर त्याची ऊर्जा मोजणे किंवा अशा प्रकारे प्रयोग करणे’, हे माझ्यासाठी पुष्कळ नवीन आहे. मला ते आवडले. तुम्हाला या कार्यासाठी अनेक शुभेच्छा ! ‘प्रत्येक नर्तक त्याने नृत्य सादर केल्यानंतर स्वतःत होणारा पालट किंवा ऊर्जा अनुभवत असतो. त्या दृष्टीनेही नृत्याविषयी संशोधन करता येते’, हे मला समजून घेता आले.’’

‘प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सौ. सोनिया परचुरे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर त्यांच्या प्रभावळीवर (ऑरावर) झालेला सकारात्मक परिणाम’ या प्रयोगाविषयी डॉ. शीला यांना दाखवल्यावर डॉ. शीला यांना ते पुष्कळ आवडले. त्यांनी ‘हे दैवी आहे !’, असे उत्स्फूर्तपणे सांगितले.

५ आ. प्रथितयश कलाकारांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य दाखवण्याची सेवा ‘पी.पी.टी.’ च्या माध्यनमातून करतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती 

५ आ १. ‘स्वतः समवेत गुरुदेव आहेत’, असे अनुभवून ‘पी.पी.टी.’तील विषय सहजतेने मांडता येणे : माझ्या मनात आरंभी ‘मी केवळ १७ वर्षांची आहे. मी अध्यात्मप्रचार करू शकीन का ? मला प्रथितयश कलाकारांच्या समोर इंग्रजी भाषेत ‘पी.पी.टी.’ सादर करायला जमेल ना ? मला योग्य प्रकारे बोलता येईल ना ?’, असे विचार येत होते. मी ‘पी.पी.टी.’ दाखवत असतांना मला गुरुदेवांचे अस्तित्व पुष्कळ प्रमाणात जाणवत होते. मला सूक्ष्मातून दिसले, ‘गुरुदेव माझ्याकडे कृपाळू दृष्टीने पहात आहेत.’ पी.पी.टी. दाखवतांना माझ्याकडून उत्स्फूर्तपणे बोलले जात होते. तिन्ही नृत्यगुरु माझे बोलणे जिज्ञासेने ऐकत होते.

५ आ २. ‘साधक श्री गुरूंची समष्टी सेवा करू शकत नसून श्री गुरूंना शरण गेल्यावर तेच साधकांकडून समष्टी सेवा करून घेतात’, याची जाणीव होणे : त्यांना ‘पी.पी.टी.’ दाखवून झाल्यानंतर मला जाणीव झाली, ‘आद्य शंकराचार्य ८ वर्षांचे असतांनाच त्यांनी देवतांवर अनेक स्तुतीपर स्तोत्रे लिहिण्यास आरंभ केला होता. मी १७ वर्षांची आहे. गुरुदेवांनीच त्यांचे कार्य करण्याची क्षमता माझ्यात दिली आहे. मला केवळ त्यांना शरण जाऊन त्यांची कीर्तनभक्ती करायची आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी माझ्यासारख्या अज्ञानी आणि लहानशा जिवाकडून समष्टी सेवा करून घेतली. ही सेवा करतांना मला शिकायला मिळाले, ‘मी सेवा करणारी कुणीच नाही. मला भगवंताला शरण जाऊन त्याला स्वतःच्या देहात अनुभवता यायला हवे आणि त्याच्या चरणी कृतज्ञ रहायला हवे.’ सच्चिदानंद गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात ‘मी त्या कलाकारांना काहीतरी दाखवले’, असा विचार आला नाही. मला श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेवांच्या कृपेच्या सागरामध्ये डुंबून गेल्यासारखे वाटत होते.

६. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘मला नृत्यातील बारकावे शिकता येऊन आणि दैवी अनुभूतींसहित पूर्ण तीन दिवसांचे शिबिर अनुभवता आले. ‘हे सिच्चदानंद परब्रह्म गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, आपल्या कृपेमुळेच मला भरतनाट्यम् नृत्य शिबिराला उपस्थित रहाता येऊन पुष्कळ शिकायला मिळाले. मला आपली कीर्तनभक्ती करता आली’, त्याबद्दल मी आपल्या चरणकमली कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– परात्पर गुरुदेवांची,

कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१५.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक