Dawood Sheikh Police Custody : यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याला ७ दिवसांची पोलीस कोठडी !

उरणऐवजी पनवेल न्यायालयात करण्यात आले उपस्थित !

दाऊद शेख अटक

उरण (जिल्हा रायगड) – यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करणारा दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला पनवेल न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथम त्याला उरण येथील न्यायालयात उपस्थित केले जाणार होते; पण पनवेल न्यायालयात उपस्थित करण्यात आले. उरणमध्ये दाऊदच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत हा निर्णय घेतला.

लग्नाला नकार दिल्याने दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचे उघड !

 

दाऊद शेख आणि यशश्री शिंदे यांची शालेय जीवनापासून मैत्री होती. दाऊदने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिच्यामागे लग्नाचा तगादाही लावला होता. त्याला यशश्रीसमवेत बेंगळुरूमध्ये स्थायिक व्हायचे होते; पण तिने नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली, असे दाऊदच्या चौकशीतून उघड झाल्याचे सांगितले जात आहे.

१. ‘मला भेटायला आली नाहीस, तर आपली छायाचित्रे फेसबुकवर प्रसारित करीन’, अशी धमकी दाऊदने तिला दिली होती. दाऊदने काही छायाचित्रे फेसबुकवर टाकलीही होती; पण नंतर त्याने ती काढली. यशश्री आरोपीपासून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

२. हत्येच्या काही मिनिटे आधी यशश्रीने तिच्या एका मित्राला भ्रमणभाष करून वाचवण्यासाठी गयावया केल्याचे समजते. यासंदर्भातही पोलीस चौकशी करत आहेत.

३. दाऊद सतत संपर्क करत असल्याने यशश्रीने त्याचा क्रमांक ‘ब्लॉक’ केला होता; पण त्यानंतर दाऊद त्याचा मित्र मोहसीनच्या भ्रमणभाषवरून तिला संपर्क करायचा.