Hamas Chief Killed : हमासचा प्रमुख इस्‍माईल हानिया ठार

  • इराणची राजधानी तेहरानमध्‍ये क्षेपणास्‍त्र आक्रमणाद्वारे केले लक्ष्य !

  • इस्रायलने ठार केल्‍याचा होत आहे दावा  

हमासचा प्रमुख इस्‍माईल हानिया

तेहरान (इराण) – हमास या आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्‍लाईल हानिया याला तेहरानमध्‍ये क्षेपणास्‍त्र आक्रमणात ठार करण्‍यात आले आहे. त्‍याच्‍या समवेत त्‍याचा अंगरक्षकही ठार झाला आहे. हानिया एरव्‍ही कतार देशामध्‍ये रहातो; मात्र इराणचे नवे  राष्‍ट्रपती मसूद पेजेश्‍कियान यांच्‍या शपथविधीसाठी तो तेहरान येथे आला होता. त्‍या वेळी हे आक्रमण करण्‍यात आले. या आक्रमणाचे अधिकृत दायित्‍व इस्रायलकडून घेण्‍यात आलेले नाही, तसेच इराणनेही या आक्रमणासाठी इस्रायलला उत्तरदायी ठरवलेले नाही. त्‍यामुळे हे आक्रमण कुणी केले ?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. असे असले, तरी इस्रायलनेच त्‍याला ठार केल्‍याचे वृत्त आहे. राजकीयदृष्‍ट्या अडचणीचे ठरू नये; म्‍हणून दोन्‍ही देश याविषयी गप्‍प आहेत.

१. हानिया वर्ष १९८७ मध्‍ये हमासमध्‍ये सामील झाला होता. वर्ष २०१७ मध्‍ये हमासचे नेतृत्‍व स्‍वीकारल्‍यानंतर हानिया याने डिसेंबर २०१९ मध्‍ये गाझा पट्टी सोडली.

२. इस्‍माईल हानियाच्‍या नेतृत्‍वाखाली गेल्‍या वर्षी ७ ऑक्‍टोबरला हमासने इस्रायलवर ७५ वर्षांतील सर्वांत क्रूर आक्रमण केले होते.

३. हानिया याने २ विवाह केले होते. एका पत्नीपासून त्‍याला १३ मुले आहेत. ज्‍या महिलेसमवेत हानिया याने दुसरे लग्‍न केले, ती महिला हानियाच्‍या एका मित्राची पत्नी आहे. या मित्राला इस्रायली सैनिकांनी ठार केले होते. इस्रायलने हानियाच्‍या बहुतेक नातेवाइकांना यापूर्वीच ठार केले होते.

४. गेल्‍या नोव्‍हेंबरमध्‍ये इस्‍माईल हानियाचे गाझा येथील घरही इस्रायलने उडवले होते. हानियाच्‍या घराचा वापर आतंकवादी घटनांसाठी होत असल्‍याचा दावा इस्रायलने केला होता.

सूड घेणार ! – हमास

हमासच्या राजकीय ब्युरोचे सदस्य मौसा अबू मारझौक म्हणाले की, हानिया याच्या मृत्यूचा सूड घेतला जाईल. हनिया याच्या भ्याड हत्येला उत्तर दिले जाईल.

आक्रमणकर्त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्‍चात्ताप करण्यास भाग पाडले जाईल ! – इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, काल (३० जुलैला) मी हानिया याचा हात वर केला आणि आज मला त्याच्या अंत्यसंस्काराला खांदा द्यावा लागेल. आम्ही ते विसरणार नाही. इराण आपली प्रादेशिक अखंडता, प्रतिष्ठा, सन्मान आणि अभिमान यांचे रक्षण करेल. आम्ही वचन देतो की, या आक्रमणकर्त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्‍चात्ताप करण्यास भाग पाडले जाईल.

उत्तरदायी असणार्‍यांना प्रत्युत्तर दिले जाईल ! – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी म्हटले की, इराणच्या हद्दीत वीरमरण आलेल्यांना न्याय मिळवून देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. याला उत्तरदायी असणार्‍यांना प्रत्युत्तर दिले जाईल.

आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलला रोखण्यासाठी कारवाई करावी ! – तुर्कीये

तुर्कीयेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, या हत्येचा उद्देश गाझामधील युद्ध प्रादेशिक स्तरावर पसरवणे हा आहे. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलला रोखण्यासाठी कारवाई केली नाही, तर आपल्या प्रदेशाला आणखी मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल. तुर्कीये पॅलेस्टिनी लोकांच्या न्याय्य भूमिकेला पाठिंबा देत राहील.

अमेरिकेचे इस्रायलला जाहीर समर्थन !

इस्रायलवर कोणतेही आक्रमण झाले, तर आम्ही त्याला उत्तर देऊ, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

७ ऑक्‍टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणात उत्तरदायी असलेल्‍या हमासच्‍या प्रमुखाला इस्रायलने एका इस्‍लामी देशाच्‍या राजधानीत क्षेपणास्‍त्र डागून ठार मारले आणि सूड उगवला. शत्रू जगाच्‍या पाठीवर कुठेही असला, तरी त्‍याला धडा शिकवणार्‍या इस्रायलकडून भारत काय बोध घेणार ?