|
देहली – येथे मुसळधार पाऊस पडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील जुने राजेंद्रनगर भागातही ठिकठिकाणी पाणी साचले. हा परिसर यु.पी.एस्.सी. परीक्षेच्या कोचिंग सेंटरसाठी ओळखला जातो. इथे यु.पी.एस्.सी.ची शिकवणी देणारे शेकडो वर्ग आहेत. यांपैकीच ‘रौस आय.ए.एस्. स्टडी सर्कल’ या कोचिंग सेंटरच्या तळघरात २७ जुलैला संध्याकाळी पाणी शिरल्यामुळे यु.पी.एस्.सी.चे परीक्षेची सिद्धता करणारे काही विद्यार्थी अडकले होते. त्यांपैकी ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तानिया सोनी (वय २५ वर्षे), श्रेया यादव (वय २५ वर्षे) आणि निविन डाल्विन (वय २८ वर्षे) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कोचिंग सेंटरच्या तळघरात अनुमती नसतांनाही तेथे ग्रंथालय चालू करणार्या कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
१. ही दुर्घटना घडली, त्या वेळी विद्यार्थी या ग्रंथालयात अभ्यास करत होते. त्या वेळी मुसळधार पावसामुळे ड्रेनेजचा पाईप फुटला आणि तळघरात पाणी साचले. यामुळे या तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते.
२. २७ जुलैला सायंकाळी ७.१९ वाजता कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून, ‘आम्ही कोचिंग सेंटरच्या तळघरात अडकलो आहोत’, असा दूरभाष आला होता. त्यानंतर अग्नीशमन दल घटनास्थळी पोचले आणि साहाय्यता कार्य चालू झाले.
३. या घटनेनंतर यु.पी.एस्.सी.चे परीक्षेची सिद्धता करणार्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.