जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता, हिंदु-मुसलमान ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार, अखंड भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आजही देशाला भोवणे अन् स्वाभिमानी सत्तेने देशावर राज्य केल्यास काय झाले असते ?, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदुत्वाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक २५)

प्रकरण ४

पू. प्रा. सु.ग. शेवडे

४. विश्वातील राष्ट्रांमधील समस्या !

येत्या काही वर्षांतच एखाद्या महायुद्धामुळे किंवा अंतर्गत वर्गसंघर्षामुळे किंवा जातीय उद्रेकामुळे किंवा सामाजिक असंतोषामुळे कशामुळे का होईना; पण ही कोंडी फुटणार आहे; कारण आज सारे जगच अत्यंत विचित्र समस्यांना तोंड देत आहे.

अ. अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यांमुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे.

आ. रशियातील साम्यवादाचा प्रयोग निष्फळ ठरून त्यांचे घटक स्वतंत्र होऊन एकमेकांच्या उरावर बसत आहेत. स्वतःच्या दारिद्र्याला मोठ्या कष्टाने तोंड देत आहेत.

इ. चीनमधील भक्कम तटबंदीचे साम्यवादी सरकार जनक्षोभावर मात करून आज उभे असले, तरी जनक्षोभाचा स्फोट कोणत्याही क्षणी होण्याचा संभव आहे.

ई. आफ्रिकेतील देशांत एकवाक्यता नाही आणि सांस्कृतिक गुलामगिरीच्या दडपणाखाली ते देश भरडले जात आहेत.

उ. मुसलमान राष्ट्रे इस्लामी म्हणून जरी एक असली, तरी शांतता, तितिक्षा, सहिष्णुता आणि सुसंस्कृतता या गोष्टींचा त्यांच्याकडे अत्यंत अभाव आहे; म्हणूनच कराची पेटत आहे, अफगाणिस्तान जळत आहे. इराण-इराकमध्ये स्नेह नाही. सर्वांमध्येच अंतर्गत धुसफूस चालू आहे. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे ज्या तेलसाठ्यांच्या बळावर त्यांची मस्ती आहे, ते अनंत काळ टिकणारे नाहीत.

ऊ. दक्षिण अमेरिकेतील अनेक राज्ये अमली पदार्थांचा धंदा करून उदरभरण करत आहेत. तिकडे पुष्कळ प्रमाणात दारिद्र्याची समस्या भेडसावत आहेच.

संपूर्ण जगात बोकाळलेली गुंडगिरी, आतंकवाद, माफिया, लुटारूंच्या टोळ्या आणि त्यांची साम्राज्ये, तसेच सर्वत्र निर्माण झालेले असुरक्षित जीवन, द्रव्याची अपरिमित लालसा, गुन्हेगारी, भ्रष्टाचार अन् शस्त्रास्त्रांची लयलूट अशी सारी स्फोटक परिस्थितीच आहे. त्यातच जगात बेकारीची समस्याही भेडसावत आहे.

५. समस्यांची कोंडी फोडणारे जीवनाचे तत्त्वज्ञान केवळ हिंदु धर्माजवळ आहे !

वर म्हटल्याप्रमाणे ही सारी कोंडी फोडणारे आणि अशी कोंडी उत्पन्नच होऊ नये, असे जीवनाचे तत्त्वज्ञान केवळ हिंदु धर्माजवळ आहे. त्यामुळे बलशाली, प्रभावी, विश्वावर वर्चस्व निर्माण करणारे ‘हिंदु राष्ट्र’ जवळच्या भविष्यकाळात उत्पन्न होईल, अशी आम्हाला निश्चिती वाटते.

६. हिंदु संस्कृती चिरंतन टिकणारी आहे !

हिंदु जीवनपद्धती आणि राजनीती येथे अनंत काळ टिकणारे अन् संस्कृतीला टिकवणारे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे ही संस्कृती कधी संपली नाही आणि संपणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले आहे, ‘‘जर एखादा देवदूत येऊन विचारील की, भारतात एकेकाळी युद्ध करून विजय मिळवणारे शक, हूण इत्यादींपैकी आता कुणी आहे का ? तर ‘मी एक हूण किंवा मी एक शक या इथे आहे’, असे म्हणणारा एकही हात वर होणार नाही; पण जर त्याने विचारले की, या हिंदु संस्कृतीवर वारंवार झालेल्या आक्रमणानंतर अजूनही कुणी हिंदु इथे आहे का ? तर कोटी कोटी हात वर होऊन सांगतील, ‘हे बघा, आम्ही हिंदू येथे आहोत.’’

(क्रमशः)

– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)