दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ठाणे येथे पोलिसांची गस्ती पथके कार्यरत !; मुंबईमध्ये चारचाकीने २ रिक्शांना उडवले !…

ठाणे येथे पोलिसांची गस्ती पथके कार्यरत !

 प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – शिळ-डायघर येथील धार्मिक स्थळाच्या परिसरात तिघांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. यानंतर ठाणे पोलीस धार्मिक स्थळांच्या परिसरात बारकाईने लक्ष घालत आहेत. पोलिसांचे ‘गुड मॉर्निंग पथक’, तसेच रात्रीच्या वेळेत गस्ती पथके कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा भूमीपुत्र संघटना आणि ओबीसी एकीकरण समिती यांनी पोलीस आयुक्तांकडे धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलीस पडताळणी करण्याविषयीचे पत्र दिले आहे.


मुंबईमध्ये चारचाकीने २ रिक्शांना उडवले !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुलुंड येथील कचराभूमी मार्ग येथे २२ जुलै या दिवशी भरधाव चारचाकीने २ रिक्शांना उडवले. या अपघातामध्ये ४ जण घायाळ झाले असून त्यांतील एका रिक्शाचालकाची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. सर्वांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघातानंतर चालकाने पलायन केले. पोलिसांनी चारचाकी कह्यात घेतली असून चालकाचा शोध चालू आहे. मागील २ मासांपासून राज्यात मद्य पिऊन भरधाव वेगाने वाहन चालवून होणार्‍या अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.


महिलेला फसवणारा आरोपी अटकेत !

अमरावती – एका महिलेला सामाजिक माध्यमांवरून प्रेमाचे संदेश पाठवणे, तिचा ऑनलाईन पाठलाग करणे, खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देणे असे करणार्‍या आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिलक ठाकूर असे आरोपीचे नाव आहे. त्याने १९ जुलै या दिवशी पहाटे ३.४१ पासून रात्री १२ पर्यंत महिलेला बरेच संदेश पाठवले.

संपादकीय भूमिका

अशांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !


मुंबईत आता ४० बाय ४० च्याच होर्डिंगला अनुमती !

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा निर्णय !

 प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – घाटकोपर येथे १२० फुटांचे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईत आता केवळ ४० बाय ४० च्याच होर्डिंगला अनुमती असणार आहे. घाटकोपर येथील होर्डिंग १२० फुटांचे होते.


महाड येथे मुसळधार पावसात दोघांचा मृत्यू

 प्रतिकात्मक छायाचित्र

महाड – येथे पडणार्‍या मुसळधार पावसात दोघांचा मृत्यू झाला. बाळाजी उतेकर (वय ६५ वर्षे) हे दुपारी गुरे चारण्यासाठी गेले असता ओहळात वाहून गेले. अंकित महामुणकर (वय २४ वर्षे) मित्रांसमवेत नदीत पोहायला गेला होता. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.  रायगड जिल्ह्यात अतीवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २२ जुलै या दिवशी महाड, पोलादपूर आणि कर्जत तालुक्यातील शाळा अन् महाविद्यालये यांना सुटी घोषित केली होती. उर्वरित १३ तालुक्यांत शाळा चालू होत्या.