शिवसेनेच्या महिला आघाडीची पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी !
मुंबई – ‘ओटीटी (ओव्हरी द टॉप) प्लॅटफॉर्म’वर ‘रिॲलिटी शो’च्या नावाखाली ‘बिग बॉस – सीझन ३’मधून अश्लीलता दाखवली जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या प्रसारणावर तातडीने बंदी घाला, अशी मागणी शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.
आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी २२ जुलै या दिवशी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ‘बिग बॉस – सीझन ३’ मधील १८ जुलैच्या भागामध्ये अरमान मलिक आणि कृतिका मलिक या कलाकारांना अतिशय बीभत्स अन् किळसवाणे कृत्ये करतांना दाखवण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या कलाकारांनी सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘बिग बॉस ३’ हा कार्यक्रम लहान मुलेही पहातात. अरमान मलिक जे बोलत आहेत, त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. या कार्यक्रमाचे निर्माते आणि प्रक्षेपण करणार्या आस्थापनांचे मुख्य कार्यकारी आयुक्त यांच्यावर ‘सायबर क्राईम’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा. हे व्हिडिओ विविध सामाजिक माध्यमांवरही प्रसारित झाले आहेत. हा गुन्हा ज्या कायद्याच्या अंतर्गत येतो, ती सर्व कलमे अश्लीलता पसरणार्यांवर लावायला हवीत.’’
केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री यांची भेट घेणार ! – आमदार डॉ. मनीषा कायंदे
‘ओटीटी’चे प्रसारण चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डच्या) कक्षेत आणण्यात यावे, यासाठी आम्ही लवकरच केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री यांची भेट घेणार आहोत.