‘एकदा मी रामनाथी आश्रमातील आगाशीत बसून परात्पर गुरुदेवांचे अनुसंधान करत होते. तेव्हा तेथील निसर्गाकडे पाहून माझी भावजागृती होऊ लागली. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांची पुष्कळ आठवण येऊ लागली आणि देवाने मला पुढील विचार दिले.
१. ‘निसर्ग एवढा सुंदर आहे, तर त्या निसर्गाची निर्मिती करणारा भगवंत किती सुंदर असेल !’ असे वाटून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मनमोहक रूप डोळ्यांसमोर येऊन स्तब्ध होणे
एकदा मी रामनाथी आश्रमासमोरील निसर्गाकडे पहात होते. निसर्ग अतिशय रम्य वाटत होता. हिरवीगार झाडे, पक्ष्यांचा उडणारा थवा, गरुड पक्ष्यांच्या गिरक्या, दूरवर दिसणारे हिरवेगार डोंगर, हे सर्व पाहून माझी भावजागृती होऊ लागली. मला वाटले, ‘हा निसर्ग एवढा सुंदर आहे, तर याला निर्माण करणारा भगवंत किती सुंदर असेल !’ असा विचार मनात आल्यावर प.पू. गुरुदेवांचे मनमोहक रूप माझ्या डोळ्यांसमोर आले आणि मी स्तब्ध झाले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचे पालनकर्ता असून तेच या ब्रह्मांडांतील प्रत्येक कणाकणामध्ये सामावले असल्याचे जाणवणे
त्यानंतर माझी दृष्टी दूरवर असलेल्या हिरव्या डोंगरांकडे गेली आणि मी गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलू लागले, ‘हे गुरुदेवा, माझी दृष्टी जिथपर्यंत जात आहे, ते दृश्य किती व्यापक आहे ! आपण साक्षात् अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचे पालनकर्ता आहात. तुम्ही त्या अनंत कोटी ब्रह्मांडांचे कसे पालन करता ? केवळ आपणच ते करू शकता. त्या ब्रह्मांडांसमोर मी किती लहान आहे, तरीही तुम्ही माझा विचार करता. एवढेच नव्हे, तर तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक कणाकणामध्ये सामावलेले आहात.’
३. ‘श्री वेङ्कटेशमङ्गल स्तोत्र’ मधील श्लोकामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘श्रीव्यंकटेशासाठी (श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांसाठी) मंगल गोष्टींची कामना करावी’, असे न वाटता ‘तेच आपले जीवन ‘मंगलमय’ करत आहेत’, असे वाटणे
तेव्हा मला श्रीविष्णूच्या ‘श्री वेङ्कटेशमङ्गल स्तोत्रा’ मधील एक सुंदर श्लोक आठवला. गुरुदेवा, हा श्लोक आपल्यासाठीच आहे.
लक्ष्मी सविभ्रमालोकसुभ्रूविभ्रमचक्षुषे ।
चक्षुषे सर्वलोकानां वेङ्कटेशाय मङ्गलम् ।। – श्री वेङ्कटेशमङ्गलाशासनम्, श्लोक २
३ अ. अर्थ : ज्याच्या भुवया आणि डोळे सुरेख आहेत अन् जे लक्ष्मीच्या अनन्यसाधारण सौंदर्याकडे पहात असतात, अशा सर्वलोकांचे नेत्र असणार्या व्यंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो !
३ आ. अनुभवलेला भावार्थ : साक्षात् सर्व लोकांचे नेत्र असणार्या श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या दृष्टीतच अवघे ब्रह्मांड सामावले असल्याने ते सर्वज्ञ आहेत. ही सर्व जीवसृष्टी त्यांच्यातच सामावली आहे. अशा ‘श्रीमन्नारायणाचे मंगल होवो’, असे आपण म्हणूच शकत नाही; कारण ‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवच आपले जीवन ‘मंगलमय’ करत आहेत’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली.’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (२५.७.२०२३)
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |