मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !
पुणे – तू महाराष्ट्रात रहातोस, तुला मराठी बोलता यायलाच पाहिजे, असे म्हणत मराठी बोलण्यास नकार देणार्या यश छल्लानी याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला. ही घटना १८ जुलै या दिवशी धानोरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी ‘मनसे’च्या गणेश पाटील आणि त्यांच्या ५ ते ६ साथीदारांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यश छल्लानी यांनी या संदर्भात तक्रार दिली होती.
तक्रारदारांचे औषधांचे दुकान आहे. ‘मनसे’चे गणेश पाटील आणि त्यांचे साथीदार दुकानात आले. तक्रारदारांना शिवीगाळ करत मारहाण केली. दुकानाच्या बाहेर ओढून अंगावर शाई टाकून क्षमा मागण्यास लावले. त्याचा व्हिडिओ सिद्ध करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून अपकीर्ती केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.