सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे करण्यात आला ‘चामुंडा होम’ !

रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि कुरुक्षेत्र येथील श्री कात्यायनीदेवीच्या मंदिरात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडला होम !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘चामुंडा होमा’च्या वेळी करण्यात आलेली पूजेची मांडणी
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

रामनाथी (गोवा) / कुरुक्षेत्र (हरियाणा) – सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे ‘चामुंडा होम’ करण्यात आला. रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र येथील श्री कात्यायनीदेवीच्या मंदिरात श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थित ‘चामुंडा होम’ पार पडला. या दोन्ही ठिकाणचा होम दुपारी १२ ते १ या वेळेत पार पडला. या दोन्ही होमाच्या वेळी ‘तिसर्‍या विश्वयुद्धात सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प्रार्थना करण्यात आली. रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील होमाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठेशाळेतील श्री. अमर जोशी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी केले. तसेच ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र श्री कात्यायनीदेवी पिठाचे महंत पू. बलराम गौतमगुरुजी यांनी चामुंडा हवन करवून घेतले.

(सविस्तर वृत्त लवकरच वाचा !)

चामुंडा होमासाठी संकल्प करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
चामुंडा होमाला नमस्कार करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

गुरुपौर्णिमेच्या दिवशी चामुंडायाग करण्याविषयी सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रे

७ जुलै २०२४ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या २४६ व्या सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचनात महर्षि म्हणाले होते, ‘वर्ष २०२४ च्या गुरुपौर्णिमेनंतर ग्रहगतीनुसार पृथ्वीवर तिसर्‍या विश्वयुद्धाचे चिन्ह दिसायला लागतील. या कालावधीत पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. पुढे होणार्‍या तिसर्‍या विश्वयुद्धात सर्वत्रच्या साधकांचे रक्षण होण्यासाठी यज्ञ-यागांची आवश्यकता आहे. यासाठी २१ जुलै २०२४ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चामुंडादेवीच्या प्रित्यर्थ यज्ञ करावा. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी महाभारत युद्ध घडलेल्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत जाऊन दुपारी १२ ते १ या मुहूर्ताच्या वेळी, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात त्याच वेळी ‘चामुंडा होम’ करावा.’