पिस्तूल, ३ काडतुसे आणि लँड क्रूझर जप्त !
पुणे – शेतकर्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोरमा खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्याची ग्रामीण पोलिसांनी झडती घेतली. या वेळी पिस्तूल, ३ काडतुसे आणि ‘लँड क्रूझर’ ही चारचाकी गाडी जप्त केली आहे. ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक केली होती. मनोरमा खेडकर यांना शस्त्राचा परवाना देतांना घालण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शस्त्र परवाना का रहित करू नये ? अशी नोटीसही पोलिसांनी त्यांना दिली आहे.
‘थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनी’च्या मालमत्तेला टाळे !
मनोरमा यांच्या नावावरील तळवडे येथील ‘थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनी’ला मिळकतकर थकवल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने टाळे ठोकले आहेत. मनोरमा या आस्थापनाच्या भोगवटादार आहेत. आस्थापनाने २ लाख ७७ सहस्र ७८९ रुपये मिळकतकर थकवला आहे. शिवाय हे आस्थापन देहूरोड दारुगोळा कारखान्याच्या ‘रेडझोन’ (धोकादायक जागा) हद्दीत येते. ही थकबाकी २१ दिवसांच्या आत भरली नाही, तर सदर मिळकतीचा जाहीर लिलाव केला जाईल, अशी नोटीसही खेडकर यांना दिली आहे.