प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय सेथूपती यांनी मध्यंतरी अभिनेत्री क्रिती शेट्टी हिच्यासमवेत अभिनय करण्यास नकार दिला; कारण त्यांचे वय ४६ वर्षे, तर तिचे वय २० वर्षे आहे. ‘मला ती माझ्या मुलीप्रमाणे आहे. त्यामुळे तिच्या समवेत मी प्रणयदृश्ये करू शकत नाही. ते मला शोभत नाही’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. असे उदाहरण आजच्या काळात पहायला मिळणे किंवा अशा प्रकारे शालीनता आणि नैतिकता जपण्याचा केला जाणारा प्रयत्न, हे वैशिष्ट्यपूर्णच म्हणावे लागेल. अभिनेते विजय सेथूपती यांच्या स्पष्टतेला आणि नातेसंबंध जपण्याच्या वृत्तीला दादच द्यायला हवी; कारण सध्या असे होत नाही. कुणीही उठतो आणि कोणत्याही वयाची अभिनेत्री किंवा अभिनेते यांच्या समवेत चित्रपट किंवा मालिका यांमध्ये अभिनय करतो. वयात २०-२५ वर्षांचे अंतर असले, तरी चित्रपटांमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी असतात. त्यांच्यावर प्रणयदृश्ये चित्रीत होतात. अर्थात् चित्रपट म्हणजे जरी वास्तव नसले, तरी नैतिक कर्तव्य ओळखून वागणारे या क्षेत्रात विरळेच असतात, अगदी विजय सेथूपतीसारखे !
वयात अंतर असल्याने वडील-मुलीचे नाते हे प्रियकर-प्रेयसीचे होऊ नये, याची दक्षता सेथूपती यांनी घेतली आहेच; पण त्यासह त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टीसमोरही आदर्श निर्माण केला आहे. ध्वनीचित्रकाच्या समोर एक वागायचे आणि त्याच्या मागे वेगळेच वागायचे, असे कलाकारांकडून बहुतांश वेळा होत असते. थोडक्यात काय, तर ‘वास्तव जगात बहुरूपी व्हायचे’, असे करणारे अनेक जण असतात; पण नाते नसले, तरी त्या नात्यातील नाजूकपणा, खरेपणा जपणारे आज अगदी हातांच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. हे भान किंवा ही जाणीव खरेतर प्रत्येकात असायला हवी. दिग्दर्शक आणि निर्माते यांनीही अभिनेते आणि अभिनेत्री निवडतांना सर्वंकष विचार करावा. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्यांविषयी मनात आदर असायला हवा.
चेहर्यावर रंगरंगोटी केली की, आईच्या वयाची स्त्री ‘प्रेयसी’ होऊ शकते; पण मनातील भावनांचे काय ? याकडेही पहायला हवे. पैशांच्या मोहापायी कोणत्याही स्तरावरील अभिनय करायला सिद्ध होणे, म्हणजे स्वतःची परिसीमा ओलांडणेच होय ! नात्यांतील दायित्व आणि कर्तव्य ओळखून वागणे, हेच खरे नाते टिकवणे आहे. नातेसंबंध जपल्यासच त्यातील सोज्वळता, शालीनता, सौंदर्य यांचे आपल्याला दर्शन घडते. अभिनेते विजय सेथूपती यांच्या उदाहरणातून या सर्वच गोष्टी समोर आल्या. सेथूपती यांनी घेतलेल्या परखड भूमिकेविषयी अभिनय क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे कौतुकही केले आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी अभिनय केल्यास त्यातील खरेपणा टिकून राहील !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.