१. एकादशी व्रत कशासाठी ?
व्रतांचे माहात्म्य सांगतांना श्रील व्यासदेव म्हणतात, ‘‘व्रत-उपवास इत्यादींचे पालन केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन आपली प्रेमाभक्ती प्रदान करतात आणि भोग तथा मोक्षही देतात. व्रतोपवास पापकर्मांना दूर सारून, पुण्याचा संचय करून भगवद्प्राप्तीच्या मार्गात साहाय्य करतो आणि भक्तीचा संचार करून प्रभूचा प्रेमीभक्त बनवतो.
व्रतेन दीक्षामाप्नोति दीक्षयाऽप्नोति दक्षिणाम् ।
दक्षिणा श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते ।।
– यजुर्वेद, अध्याय १९, कण्डिका ३०
अर्थ : व्रतामुळे दीक्षेची प्राप्ती होते आणि दीक्षेमुळे दाक्षिण्य अर्थात् व्रतामध्ये दक्षता, पात्रता यांची उपलब्धता होते. दाक्षिण्यामुळे श्रद्धेची पुष्टी आणि श्रद्धेने सत्याची प्राप्ती होते.
सत्याचे तात्पर्य आहे – सत्य स्वरूप परमात्मा.
अशा प्रकारे व्रताचे सर्वाेच्च फळ आहे भगवद् प्रसन्नता आणि भगवद्प्राप्ती ! यास्तव व्रत निष्काम भावाने भगवद्प्रीत्यर्थ, भगवंतांना पूर्णपणे समर्पित होऊन करावे.
या व्रतांमध्ये फलाकांक्षांचा नितांत अभाव असतो. ज्या प्रकारे नद्यांमध्ये गंगा, नक्षत्रांमध्ये चंद्र आणि देवतांमध्ये भगवान विष्णु प्रमुख आहेत, त्याच प्रकारे व्रतांमध्ये एकादशी व्रत प्रमुख आहे. हे व्रत केल्याने काही भौतिक लाभ होत असले, तरी या व्रतामुळे हृदयाचे शुद्धीकरण होऊन भगवंतांची प्राप्ती होते. यास्तव या तिथीला ‘हरिवासर’, म्हणजे ‘हरींचा दिवस’ म्हणतात. एकादशी तिथी भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे.
अत्र व्रतस्य नित्यत्वादवश्यं तत् समाचरेत् ।
सर्वपापापहं सर्वार्थदं श्रीकृष्णतोषणम् ।।
अर्थ : या व्रताचे अवश्य नित्य आचरण करावे. ते समस्त पापांचे हरण करणारे आहे आणि समस्त अर्थांना प्रदान करणार्या श्रीकृष्णांना संतुष्ट करणारे आहे.
२. एकादशी व्रताची तत्त्वे
एकादशी व्रताच्या नित्यतेची ४ तत्त्वे आहेत.
तच्च कृष्णप्रीणनत्वाद्विधिप्राप्तत्वतस्तथा ।
भोजनस्य निषेधाच्चाकरणे प्रत्यवायतः ।।
अर्थ : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी या व्रताचा विधी सांगितला आहे आणि पापांचे परिमार्जन करण्यासाठी भोजनाचा निषेध (उपवास) करण्यास सांगितला आहे.
१. भगवान श्रीहरींच्या संतुष्टाचे विधान – त्यांची प्रसन्नता.
२. शास्त्रांमध्ये एकादशी व्रत करण्याची आज्ञा आहे – या आज्ञेचे पालन.
३. भोजन करण्याच्या दोषापासून स्व-संरक्षण.
४. व्रत न केल्याने भजन भक्तीमध्ये विघ्न – परिणामी पाप.
वराह पुराणात म्हटले आहे,
एकादश्यां निराहारो यो भुङ्क्ते द्वादशीदिने ।
शुक्ले वा यदि वा कृष्णे तद्व्रतं वैष्णवं महत् ।।
– वराहपुराण, अध्याय ६५, श्लोक ७
अर्थ : जो शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील एकादशीला निराहारी राहून द्वादशीला अन्नसेवन करतो, असे हे व्रत श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात,
ज्यासी नावडे हे व्रत । त्यासी नरक तोहि भीत ।।
ज्यासी घडे एकादशी । जाणे लागे विष्णुपाशी ।।
तुका म्हणे पुण्यराशी । तोचि करी एकादशी ।।
अर्थ : ज्याला हे एकादशी व्रत आवडत नाही, त्याला नरकही घाबरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चितच वैकुंठाची प्राप्ती होते. यास्तव जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘ज्याने गतजन्मात पुण्याच्या राशी गोळा केल्या आहेत, तोच एकादशी व्रताचे पालन करतो.’’
३. एकादशीला अन्नधान्य वर्ज्य
शुक्ल वा कृष्ण पक्षातील, म्हणजेच प्रत्येक मासातील एकादशी तिथीला भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रांमधून दिलेले आहेत. त्याचे सार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी पुढीलप्रमाणे सांगितले आहे. –
एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन ।।
श्वान विष्ठेसमान । अधम जन ते एक ।।
तया देही यमदूत । जाले तयाचे अंकित ।।
तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलिया ।।
अर्थ : जे लोक एकादशीस अन्नग्रहण करतात, भोजन करतात, ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते; कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करत नाहीत, तो यमदूतांचा अंकित होतो, म्हणजे नरकवासी होतो.
एकादशी तिथीला पापपुरुष अन्नात वास करतो, त्यामुळे अन्न ग्रहण करू नये. गहू, सातू, जोंधळे, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी अन्नधान्ये आणि तूर, मसूर, हरभरा, चवळी, मूग, मटकी, राजमा वा तत्सम बी-बियाणे इत्यादी कडधान्ये एकादशीला खाऊ नयेत. तीळ केवळ ‘षट्तिला’ या एकाच एकादशीला खाणे, अन्य एकादशींना वर्ज्य. मोहरी, मेथीदाणे, ओवा किंवा तत्सम मसाले फोडणीसाठी वापरू नयेत. सोयाबीन किंवा त्याचे तेल, मोहरीचे तेल, कापसाचे तेल वा अन्य धान्याची तेले वापरू नयेत. खोबरेल, शेंगातेल वा गायीचे तूप वापरावे. सर्व प्रकारची फळे, सुकामेवा, बटाटे, रताळी, फळभाज्या यांचा वापर करावा. बेकींग सोडा, रासायनिक रंग, समुद्रातील मीठ वापरू नये. त्याऐवजी खनिज मीठ, पादेलोण वा सैंधव वापरावे. हिंग वापरू नये. बाजारू पदार्थ खाऊ नये.
वस्तूतः पाणी न पिता एकादशीचा उपवास करावा. तसे करणे शक्य नसेल, तर गायीचे दूध, फळे, सुकामेवा इत्यादी ग्रहण करावे. शक्यतो अल्प प्रमाणात घ्यावे. असे कधीही करू नये की, एकादशी दुप्पट खाशी आणि तरीही आम्ही उपाशी !
शास्त्रातून उल्लेख आहे, ‘एकादश्यां न भुञ्जीत पक्षयोरुभयोरपि ।’ (नारदपुराण, पूर्वखण्ड, अध्याय २३, श्लोक ४) म्हणजे ‘(शुक्ल आणि कृष्ण) दोन्ही पक्षांच्या एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण करू नये.’
४. एकादशी व्रत केल्याने मिळणारे फळ
एकादशी तिथी महान पुण्यफळ देणारी आहे. यासाठी सभ्य मनुष्यांनी एकादशी व्रत पार पाडले पाहिजे. विशिष्ट नक्षत्रांचा योग जुळून आल्यानंतर ही एकादशी तिथी जया, विजया, जयंती आणि पापमोचनी अशा ४ नावांनी प्रसिद्ध होते. या एकादशी सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणार्या आहेत.
अ. जेव्हा शुक्ल पक्षातील द्वादशीला ‘पुनर्वसु’ नक्षत्र असते, तेव्हा ती एकादशी तिथी ‘जया’ संबोधली जाते. या एकादशीचे व्रत केल्यामुळे मनुष्य निश्चितपणे समस्त पापांपासून मुक्त होऊन परमधामास जातो.
आ. जेव्हा शुक्ल पक्षातील द्वादशीला ‘श्रवण’ नक्षत्र असते, तेव्हा त्या उत्तम तिथीला ‘विजया’ संबोधले जाते. या तिथीवर केलेले दान, जप, कीर्तन आणि साधू-ब्राह्मण भोजन इत्यादी सहस्रोपटींनी फळ देणारे असते अन् उपवास तर त्याहूनही अधिक फळ देणारा असतो.
इ. जेव्हा शुक्ल पक्षातील ‘द्वादशीला ‘रोहिणी’ नक्षत्र असते, तेव्हा ती उत्तम तिथी ‘जयंती’ म्हणून संबोधली जाते. ही समस्त महापातकांचे हरण करते. या तिथीला श्रीहरींची आराधना केल्याने श्रीहरि निश्चितच सर्व पापांना धुतात.
ई. जेव्हा शुक्ल पक्षातील द्वादशीला ‘पुष्य’ नक्षत्र असते, तेव्हा ती महापुण्यवान तिथी ‘पापमोचनी’ संबोधली जाते. संपूर्ण एक वर्ष प्रत्येक दिवशी तिळाचे दान केल्याने जे फळ मिळते तेवढेच फळ ‘पापमोचनी एकादशी’चे व्रत केल्याने मिळते. या दिवशी श्रीहरीची पूजा केल्याने ते संतुष्ट होऊन प्रत्यक्ष दर्शन देतात. या दिनी केलेले प्रत्येक पुण्यकर्म अनंत पटीने अधिक फळ देणारे असते.
या तिथीला व्रत केल्यामुळे मनुष्य ७ जन्मांतील कायिक, वाचिक आणि मानसिक पापातून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो. यात किंचित्ही शंका नाही. ‘पुष्य’ नक्षत्राने युक्त असलेल्या या एकमेव पापमोचनी एकादशीचे व्रत करून मनुष्य १ सहस्र एकादशी व्रतांचे फळ प्राप्त करतो. या दिनी पवित्र तीर्थस्नान, दान, जप, स्वाध्याय, भगवद्पूजन, श्रवण आणि कीर्तन इत्यादी जे काही शुभकर्म केले जाते, त्याचे अक्षय फळ प्राप्त होते. असे महत्त्वपूर्ण वर्णन ‘पद्मपुराणा’तील उत्तरखंडातील ४० व्या अध्यायात केलेले आहे. त्याचे हे संक्षिप्त वर्णन आहे.
५. एकादशी व्रत कुणी करावे ?
अ. शास्त्र वचन असे आहे, ‘एकादश्यां न भुञ्जीत कदाचिदपि मानवः ।’, म्हणजे ‘मनुष्याने एकादशीला अन्नग्रहण करू नये.’
आ. ‘एकादश्यां न भुञ्जीत नारी दृष्टे रजस्यपि ।’, म्हणजे ‘स्त्रियांनी मासिक धर्म (रजस्वला) असतांनाही एकादशी व्रताचा त्याग करू नये’.
इ. वारंवार खाणे अथवा जल आदी पिण्याने व्रत भंग होतो. व्रतस्थ व्यक्तीने दिवसा झोपणे निषिद्ध आहे. स्त्रियांनी स्त्रीधर्म रजस्वला असतांना व्रताचा त्याग करू नये. (केवळ पूजन इत्यादी करू नये.)
ई. सोयर-सूतक असतांनाही एकादशीचे व्रत केले पाहिजे, तसेच नाम अपराध, सेवा अपराध आणि वैष्णव अपराध यांपासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे.
उपवासात बाधा आणणारे १२ दोष आहेत. व्रताचे संपूर्ण फळ तेव्हाच मिळते, जेव्हा आम्ही दोष मुक्त राहून व्रत करतो. या दोषांपासून प्रयत्नपूर्वक स्वतःला वाचवले पाहिजे. १. काम, २. क्रोध, ३. मोह, ४. मद, ५. असंतुष्टता, ६. निर्दयता, ७. असूया, ८. अभिमान, ९. शोक, १०. स्पृहा, ११. ईर्ष्या आणि १२. निंदा, हे मनुष्यात वास करणारे १२ दोष असून यांचा मनुष्याने सदैव त्याग केला पाहिजे. जसे पारधी पशूंना मारण्यासाठी संधीची वाट बघत असतो, तसेच हे एकेक दोष मनुष्याच्या गुणांवर आक्रमण करण्यासाठी टपून बसलेले असतात.
गृहस्थो ब्रह्मचारी च आहिताग्निर्यतिस्तथा ।
एकादश्यां न भुञ्जीत पक्षयोरुभयोरपि ।।
अर्थ : गृहस्थ, ब्रह्मचारी, आहिताग्नी धारण केलेला (सोमयागासारखा श्रौतयज्ञ करण्याचा अधिकार असलेला) आणि संन्यासी या ४ आश्रमवासियांनी एकादशीच्या दिवशी अन्नप्राशन करू नये.
अष्टवर्षाधिको मर्त्या ह्यपूर्णाशीतवत्सरः ।
एकादश्यामुपवसेत् पक्षयोरुभयोरपि ।।
अर्थ : ८ वर्षांवरील वयाच्या बालकापासून ८० वर्षे वयाच्या वृद्धापर्यंत सर्वांनी (शुक्ल आणि कृष्ण) दोन्ही पक्षांतील एकादशीला उपवास करावा.
शिव उपासकांसाठीसुद्धा एकादशी व्रत आवश्यक आहे. याविषयी शिव-पार्वती संवाद पद्मपुराणात आहे – यो भुङ्क्ते वासरे विष्णोर्ज्ञेयः पश्वधिको हि सः । (पद्मपुराण, उत्तरखण्ड) (अर्थ : जो एकादशीला भोजन करतो, तो मनुष्य पशूहूनही हीन समजावा.)
विप्रियं च कृतं तेन दुष्टेनैव च पापिना ।
मद्भक्तिबलमाश्रित्य यो भुङ्क्ते वै हरेर्दिने ।।
– पद्मपुराण, उत्तरखण्ड, अध्याय ३७, श्लोक ६१
अर्थ : एकादशीच्या दिवशी माझ्या भक्तीच्या बळाचा आश्रय घेऊन जो भोजन ग्रहण करतो, तो दुष्ट, पापी मला कधीही प्रिय होत नाही.
६. वृद्ध आणि व्याधीग्रस्त यांनी एकादशीचे व्रत करावे कि नाही ?
वृद्ध आणि व्याधीग्रस्त असलेल्या अशक्त व्यक्तीने कडक उपवास करू नये, तसेच ज्यांचे वय ८० वर्षे झालेले आहे, पित्तकारक प्रकृती आहे आणि ३० वर्षांपेक्षा अधिक काळ ज्यांनी हे व्रत पाळलेले आहे, अशा लोकांनी एक वेळ उपवासाचे पदार्थ खाण्यास कोणतीही आडकाठी नाही; परंतु धडधाकट मनुष्य काहीतरी बहाणा बनवून एकादशीला भरपूर खात असेल, तर त्याच्याकडून अपराध घडेल.
७. एकादशी व्रत केव्हा करावे ?
सर्व साधारणपणे प्रत्येक मासात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील ११ व्या तिथीला ‘एकादशी’ म्हणतात; परंतु प्रत्येक एकादशी तिथी व्रतासाठी ग्राह्य मानली जात नाही. दशमी तिथीने युक्त एकादशी असेल, तर वैष्णव त्या दिवशी उपवास करत नाहीत; परंतु दुसर्या दिवशी सूर्याेदयाला काही काळ एकादशी असेल आणि नंतर द्वादशी असेल, तर द्वादशीयुक्त एकादशीला उपवास करावा, तसेच पहिल्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर एकादशी आहे, म्हणजेच संपूर्ण दिवस एकादशी असेल आणि दुसर्या दिवशी प्रातःकाळी एक पळभर एकादशी असेल, तर दुसर्या दिवशी युक्त एकादशीलाच व्रत केले पाहिजे. हा विधी दोन्ही पक्षातील एकादशींना लागू आहे.
उदयस्था तिथिर्या हि न भवेद्दिनमध्यमाक् ।
सा खण्डा न व्रतानां स्यादारम्भश्च समापनम् ।। – निर्णयसिन्धु
अर्थ : ज्या तिथीला सूर्याेदय होतो, ती तिथी जर दुपारपर्यंत रहात नसेल, तर त्या तिथीला व्रतारंभ करू नये. खंडित न होणार्या तिथीला व्रताचा आरंभ आणि समाप्ती करावी.
दशमीयुक्त एकादशी धन आणि संतती यांचा नाश करणारी असते. ही समस्त पुण्यांचा नाश करते, तसेच कृष्णभक्तीचाही नाश करते. नारद पुराण आणि पद्म पुराण यांत दशमीयुक्त एकादशीला व्रत करण्याचा सर्वथा निषेध केलेला आहे. नारद पुराणातील उत्तर भाग ‘आद्यंत, अध्याय २, एकादशी’ प्रकरणाने भरलेला आहे.
८. एकादशी तिथीचा आहार
एकादशी तिथीला कोणता आहार घेतला पाहिजे ? याविषयी अनेक भ्रम आहेत; परंतु शास्त्रांमध्ये आहाराविषयी निर्देश आहे की, निर्जल-निराहार रहाणे शक्य नसेल, तर केवळ वायू भक्षण करावा. वायूसेवनाने कार्य चालत नसेल, तर पंचगव्य किंवा तूप घ्यावे. त्यानेही भागत नसेल, तर जल किंवा दूध घ्यावे अथवा तीळ किंवा फळे वा अन्नाव्यतिरिक्त हविष्यान्न ग्रहण करावे. येथे ज्या पदार्थांची नावे घेतली आहेत, त्यातील क्रमानुसार जर आधीच्या पदार्थाने भागत नसेल, तर पुढचा पदार्थ ग्रहण करावा. अर्थात् तुपाने भागत नसेल, तर पाणी प्यावे. पाण्याने भागत नसेल, तर दूध प्यावे आणि दुधाने भागत नसेल, तर तीळ किंवा फळ ग्रहण करावे. याचा अर्थ असा नव्हे की, सर्व पदार्थांचे एकसाथ पोटभर भोजन करावे.
श्रील प्रभुपाद सांगतात की, उपवासाला फळे आणि कंदमुळे ग्रहण करा तथा अन्नधान्य आणि कडधान्ये वर्ज्य करा.
(साभार : मासिक ‘गोडसेवादी’, जुलै २०१६)