India Russia Relation : (म्हणे) ‘भारताने रशियाशी असलेले संबंध वापरून युक्रेन युद्ध थांबवावे !’ – अमेरिका

अमेरिकेचे भारताला आवाहन !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की, भारताचे पंतप्रधान मोदी व रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाशी भारताचे जुने आणि भक्कम संबंध आहेत अन् सर्वांना हे ठाऊक आहे. त्यामुळे भारताने रशियासमवेतच्या या दृढ संबंधांचा वापर करून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनविरुद्ध चालू असलेले अवैध युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करावे, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी केले. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी रशियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रशिया दौर्‍यावर टीका केली होती.

भारताने पुतिन यांना संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा आणि युक्रेनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचाही आदर करण्यास सांगावे, असेही मिलर यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेने भारताला असे सांगण्यापेक्षा ‘युक्रेनने ‘नाटो’ संघटनेत सहभागी होऊ नये’, असे अमेरिका युक्रेनला का सांगत नाही ? ‘युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होऊ नये’, अशी रशियाची इच्छा होती आणि ती युक्रेनने धुडकावल्यामुळे युद्ध चालू झाले आहे. युक्रेनने नाटोमध्ये जाण्याची इच्छा रहित केली की, रशिया युद्ध लगेच थांबवेल, त्यामुळे अमेरिकेने प्रथम युक्रेनला सल्ला द्यावा, असे भारताने अमेरिकेला सांगितले पाहिजे !