मुंबई, १५ जुलै (वार्ता.) – भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य सौ. पंकजा मुंडे यांच्याविषयी एबीपीसह इतर काही वृत्तवाहिन्यांवर जाणीवपूर्वक ‘फेक नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) सेट व्हावा यादृष्टीने बातम्या चालवल्या जात आहेत. कोणत्याही सूत्राला ताणून धरत संबंध नसतांना पंकजाताई मुंडे यांच्याविषयी राजकीयदृष्ट्या नकारात्मक ‘नॅरेटिव्ह सेट’ व्हावा, असे जाणीवपूर्वक करण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्या संतप्त झाल्या असून संबंधित वृत्तवाहिन्यांवर मानहानीचा दावा प्रविष्ट करण्याची चेतावणी पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या आय.ए.एस्. पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात प्रतिदिन वेगवेगळी सूत्रे समोर येत आहेत. पूजा खेडकर यांचा भाजपशी संबंध नसतांनाही तो दाखवण्यात आला आहे. खेडकर या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याच्या अतिरंजित बातम्या चालवून सनसनाटी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून आणि ‘टी.आर्.पी.’च्या मागे धावतांना एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या भवितव्याला बाधा आणण्याचे काम केले जात आहे.
विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या विधानांमधून अर्धसत्य विधाने काढून तेवढ्याच नकारात्मक संदेश जाणार्या बातम्या चालवणे, अनेक विधानांचा विपर्यास करणे, मनाला येईल ते अन्वयार्थ लावणे आदी विविध प्रकार मुंडे यांच्याविषयी वर्ष २०१४ पासून चालू आहेत. हे कुणीतरी जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदार झाल्या आहेत. त्यांना मंत्रीही केले जाणार असल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे; मात्र त्यांच्याविषयी खोडसाळपणाने ‘फेक नॅरेटिव्ह’ करण्याचा प्रयत्न चालू आहे.