परीक्षा देण्याचे प्रयत्न संपल्यानंतरही दिली परीक्षा !
पुणे – प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी ‘यू.पी.एस्.सी.’चे (केंद्रीय लोकसेवा आयोगाचे) सर्व प्रयत्न संपल्यानंतरही नावामध्ये पालट करून परीक्षा दिल्याची माहिती समोर येत आहे. पूजा खेडकर यांनी ११ वेळा परीक्षा दिली आहे, असे वृत्त ‘साम टीव्ही’ने दिले आहे. खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी वर्ष २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर वर्ष २०२१-२२ मध्ये त्यांनी आपल्या नावामध्ये पालट केला. त्यांनी पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर, असे नाव धारण करून प्रयत्न संपल्यानंतरही २ वेळा परीक्षा दिली आहे. सर्वसामान्यपणे पूजा यांना ओबीसी (इतर मागासवर्ग) प्रवर्गातून ९ वेळा परीक्षा देता येत होती. त्यांनी नावामध्ये पालट करून २ वेळा अशी एकूण ११ वेळा परीक्षा दिली आहे.
मनोरमा खेडकर यांना पिस्तुलाचा परवाना रहित का करू नये ? अशी नोटीस !
मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील शेतकर्यांना पिस्तुलाचा धाक दाखवल्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर खेडकर यांना ‘पिस्तुलाचा परवाना रहित का करू नये ?’, अशी नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केली आहे. नोटिशीला १० दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश दिले असून ती त्यांच्या बंगल्याच्या दारावर चिटकवली आहे.
पूजा खेडकर यांच्या वाहनांवरील दंड चालकाने भरला !
खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिणे, ‘अंबर दिवा’ लावणे यांसह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या गाडीवर २७ सहस्र ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. हा दंड गाडीचालकाने निगडी वाहतूक विभागामध्ये भरला आहे.
संपूर्ण खेडकर कुटुंब पसार !
पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर पोलिसांनी कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटिसा चिकटवल्या आहेत. जेव्हा पोलीस कारवाईसाठी त्यांच्या बाणेर भागातील घरी पोचले, तेव्हा तेथे कुणीच नव्हते. त्यामुळे खेडकर कुटुंबाचा शोध ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.