विशाळगडावरील अतिक्रमण करून बांधलेली घरे आणि दुकाने यांवर अज्ञात तरुणांकडून दगडफेक !

कोल्‍हापूर – विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍यासाठी प्रशासन कोणतीच कृती करत नसल्‍याने १४ जुलैला गडावर जाणार, असे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घोषित केले होते. त्‍यानुसार ते १४ जुलैला सकाळी ९ वाजता गडाकडे रवाना झाले. ते गडावर पोचण्‍यापूर्वीच सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास विशाळगडावरील अतिक्रमण करून बांधलेल्‍या घरांवर काही अज्ञात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात काही घरांच्‍या काचा फुटल्‍या, तर काही दुकानांवरही दगडफेक करण्‍यात आली. तेथील काही नागरिकांनी आंदोलनकर्त्‍यांनी त्‍यांना मारहाण केल्‍याचाही आरोप केला आहे.

दगडफेक झाल्‍याने विशाळगडावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच पोलीस बंदोबस्‍त वाढवला होता. ‘ही दगडफेक नेमकी कुणी केली ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत.

अन्‍य घडामोडी

१. सकाळी ९ वाजता माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्‍हापूर येथे प्रारंभी श्री भवानीदेवीची आरती केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीला अभिवादन करून विशाळगडाकडे निघाले. या वेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्‍हणाले, ‘‘विशाळगडावर गेल्‍यामुळे माझ्‍यावर गुन्‍हा नोंद झाला, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्‍यासाठी मी विशाळगडावर जाणारच आहे. राज्‍य सरकार हे स्‍थानिक लोकप्रतिनिधींच्‍या दबावाखाली विशाळगड अतिक्रमणमुक्‍त होऊ देत नाही. विशाळगडावर १५६ जणांनी अतिक्रमण केले असून त्‍यांतील केवळ ६ जणांनी केलेले अतिक्रमण हटवण्‍यास न्‍यायालयाने स्‍थगिती दिली आहे. असे आहे, तर मग राज्‍य सरकार उर्वरित अतिक्रमण का हटवत नाही ?’’

२. संभाजीराजे मलकापूर-बांबवडे परिसरात पोचल्‍यावर तेथे शिवप्रेमींनी त्‍यांना हातोडा भेट दिला.

३. या सर्व तणावाच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा प्रशासनाने जमावबंदी घोषित केली आहे, तसेच विशाळगड परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.

४. सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी यापूर्वीच ७ जुलैला विशाळगडावर महाआरती केली असल्‍याने सर्व संघटनांनी एकत्र येऊन ‘१४ जुलैला आम्‍ही गडावर जाणार नाही, तसेच हिंदु समाजातील तरुणांनी तेथे जाऊन राजकीय बळी पडू नये’, असे आवाहन पत्रकार परिषद घेऊन केले होते.

कायदेशीर गोष्‍टी पडताळून अतिक्रमणांवर योग्‍य ती कारवाई केली जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

पंढरपूर – केवळ विशाळगडच नाही, तर राज्‍यातील सर्वच गड हे अतिक्रमणमुक्‍त असले पाहिजेत, त्‍यांचे पावित्र्य जपले पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. त्‍यामुळे विशाळगडच नाही, तर सर्वच गडांवरील अतिक्रमणांविरुद्ध कायदेशीर गोष्‍टी पडताळून योग्‍य ती कारवाई केली जाईल. या संदर्भात माझे छत्रपती संभाजीराजे आणि कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी यांच्‍याशी बोलणे झाले आहे, अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.