फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांची जागेसाठी भांडणे !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर पुणे नगर रस्त्यावर ‘सीटीएस १७ फायनल प्लॉट क्रमांक २० बंडगार्डन’ या अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ‘मोबोस कंपाऊंड’ नावाने ओळखल्या जाणार्‍या जागेवर अनेकांचा डोळा आहे. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांची या सव्वा दोन एकर जागेसाठी भांडणे होत आहेत. निर्वासिताला दिलेल्या सव्वा दोन एकर जागेच्या ताब्याच्या वादामधून एका बांधकाम व्यावसायिकासह दोघांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या जागेवर अतिक्रमणेही झालेली होती. न्यायालयाने ही अतिक्रमणे काढून टाकण्याचा आदेश दिलेला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने गुन्हा नोंद करून तातडीने येथील शेकडो अतिक्रमणे काढून टाकली. या वेळी २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

या प्रकरणी बसंतकुमार जैन आणि दीपक गोगरी अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे असून मंडल अधिकारी पुष्पा गोसावी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. भारताची वर्ष १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातून निर्वासित झालेल्या नागरिकांना देशभरात विविध ठिकाणी जागा देण्यात आलेल्या होत्या. कन्हैयालाल बिजलानी आणि त्यांचे बंधू यांच्या कुटुंबियांना ही जागा देण्यात आलेली होती. पुणे-नगर रस्त्यावरील मंगलदास पोलीस चौकीजवळच्या पेट्रोलपंपासमोर ही मोकळी जागा आहे.