नागरिकांना काळजी घेण्याचे सातारा जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

सातारा, ११ जुलै (वार्ता.) – हवामान विभागाने सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरड प्रवण क्षेत्रात रहाणार्‍या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठी रहाणार्‍या नागरिकांनी सतर्क रहावे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी, नाले आणि ओढे यांच्या पुलावरून पाणी वहात असल्यास पूल ओलांडू नये. पर्यटन स्थळे म्हणजे धबधबे, धरण परिसर, तलाव परिसर, घाटमाथा इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जाणे टाळावे. पाऊस पडत असतांना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच भ्रमणभाषचा उपयोग टाळावा. प्रवास करतेवेळी घाट रस्त्यात अकारण थांबू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच अफवा पसरवू नये.