जागतिक नेत्‍यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍यासारखे आध्‍यात्‍मिक असावे !

ऑस्‍ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्‍त्रज्ञ अँटोन जिलिंगर यांचे विधान

ऑस्‍ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्‍त्रज्ञ अँटोन जिलिंगर (डावीकडे) आणि नरेंद्र मोदी

व्‍हिएन्‍ना –  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय आध्‍यात्‍मिक आहेत आणि जगातील नेत्‍यांनी त्‍यांचे हे वैशिष्‍ट्य अंगीकारले पाहिजे, असे उद़्‍गार ऑस्‍ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्‍त्रज्ञ अँटोन जिलिंगर यांनी येथे काढले. ऑस्‍ट्रियाच्‍या भेटीच्‍या वेळी पंतप्रधान मोदी यांनी अँटोन जिलिंगर यांची भेट घेतली आणि त्‍यांच्‍याशी तंंत्रज्ञान अन् अध्‍यात्‍म या विषयांवर चर्चा केली.

वर्ष २०२२ मध्‍ये भौतिकशास्‍त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे शास्‍त्रज्ञ पुढे म्‍हणाले, जेव्‍हा प्रतिभावान तरुणांना त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या कल्‍पनांवर आधारित संशोधन करण्‍यास समर्थन दिले जाईल, तेव्‍हाच खर्‍या अर्थाने नव्‍या कल्‍पना उदयास येतील. हे प्रत्‍येक देशात घडू शकते, भारतातही निश्‍चितच घडू शकते; कारण भारताचा आध्‍यात्‍मिक आणि तांत्रिक भूतकाळ समृद्ध आहे.

पंतप्रधान मोदी यांनी चार प्रमुख ऑस्‍ट्रियन शास्‍त्रज्ञ आणि भारतीय इतिहासाचे अभ्‍यासक यांची भेट घेतली. त्‍यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्‍यासक आणि भाषाशास्‍त्रज्ञ डॉ. बिर्गिट केलनर, आधुनिक दक्षिण आशियाचे अभ्‍यासक प्रा. मार्टिन गेन्‍स्‍ले, व्‍हिएन्‍ना विद्यापिठातील दक्षिण आशियाई अभ्‍यास विभागाचे प्राध्‍यापक डॉ. बोरेन लारियोस आणि व्‍हिएन्‍ना विद्यापिठातील इंडोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. करिन प्रिसेंडान्‍झ यांच्‍याशी संवाद साधला.

भारत आणि ऑस्‍ट्रियाकडून आतंकवादाचा निषेध !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्‍ट्रियाचे चान्‍सलर कार्ल नेहॅमर यांच्‍यातील चर्चेनंतर प्रसिद्ध केलेल्‍या संयुक्‍त निवेदनात, दोन्‍ही देशांनी पाकिस्‍तान आणि चीन यांना लक्ष्य केले.  सीमापार आणि सायबर आतंकवादासह सर्व प्रकारच्‍या आतंकवादाचा दोन्‍ही नेत्‍यांनी निषेध केला.