दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माकडाने पाण्यात फेकलेल्या पर्समध्ये होते ३५ सहस्र रुपये !; २ जहाल नक्षलवादी अटकेत !…

माकडाने पाण्यात फेकलेल्या पर्समध्ये होते ३५ सहस्र रुपये !

यवतमाळ – येथे एका गावात पायी जाणार्‍या महिलेवर आक्रमण करत तिच्या गळ्यातील पर्स माकडाने हिसकावली. ती उघडून त्यात खाऊ नसल्याचे लक्षात आल्यावर शेजारच्या बंधार्‍यात फेकून दिली. त्यात रोख ३५ सहस्र रुपये आणि १ तोळ्याची सोन्याची पोत होती. बंधार्‍यात शोध घेऊन केवळ १४ सहस्र रुपयेच हाती लागले.


२ जहाल नक्षलवादी अटकेत !

गडचिरोली – हत्या, जाळपोळ, चकमक यांसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणांवर आक्रमण करणार्‍या २ जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. रवि मुरा पल्लो (वय ३३ वर्षे) आणि दोबा कोरके वड्डे (वय ३१ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या दोन नक्षलवाद्यांवर सरकारचे १० लाखांचे पारितोषिक होते.


महिला पोलिसाची आत्महत्या !

नागपूर – प्रियकराने लग्नाचे वचन देऊनही दुसर्‍याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला पोलीस कर्मचार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतीक्षा भोसले (वय २८ वर्षे) असे मृत महिला पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

संपादकीय भूमिका : मनोबल उंचावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत !