काबुल – अफगाणिस्तानातील तालिबान सरकार देशात क्रिकेटच्या विजयाचा जल्लोष साजरा करत असल्याने इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतातील संघटनेचे आतंकवादी संतप्त झाले आहेत. इस्लामिक स्टेट खोरासानचा अल् अझीम याने ‘क्रिकेट हे पाश्चात्य देशांनी मुसलमानांविरुद्ध चालू केलेले बौद्धिक युद्ध आहे’, असा दावा केला आहे. अल् अजीम म्हणाला की, तालिबान सरकार अफगाणिस्तान क्रिकेट संघाला प्रोत्साहन देत आहे. मुसलमान तरुणांनी क्रिकेट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या करमणुकीऐवजी ‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभामी व्हावे.
इस्लामिक स्टेट खोरासानचे तालिबानविरुद्ध युद्ध !
इस्लामिक स्टेट खोरासान आणि तालिबान यांच्यात सत्तासंघर्ष चालू आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केल्यापासून, इस्लामिक स्टेट खोरासानने अनेक आक्रमणे केली आहेत. या आक्रमणांमध्ये तालिबानची मोठी हानी झाली आहे.
काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानचे सरकार तालिबानवर नियंत्रण ठेवण्यासाठी इस्लामिक स्टेट खोरासानला साहाय्य करत आहे.