India Can End Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्‍याची क्षमता भारतामध्‍ये आहे ! – अमेरिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी

वॉशिंग्‍टन (अमेरिका) – भारत आणि अमेरिका हे धोरणात्‍मक भागीदार आहेत. दोन्‍ही देशांमध्‍ये प्रत्‍येक सूत्रावर स्‍पष्‍ट चर्चा होत आहे. युक्रेनचा विचार केला, तर भारतासह सर्व देश चिरस्‍थायी शांतता प्रस्‍थापित करण्‍याच्‍या प्रयत्नांना पाठिंबा देतात. रशिया आणि भारत यांच्‍यात चांगले संबंध असल्‍यामुळे या युद्धावर नियंत्रण मिळवता येईल. रशियाशी बोलून युद्ध थांबवण्‍याची क्षमता भारतामध्‍ये आहे, असे अमेरिकेला वाटते, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन यांच्‍या मॉस्‍को येथे झालेल्‍या भेटीनंतर व्‍यक्‍त केली आहे. मोदी आणि पुतिन यांच्‍यात रशिया-युक्रेन युद्धावरही चर्चा झाली. या वेळी ‘सध्‍याचा काळ युद्धाचा नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्‍हटले. या युद्धात अमेरिका उघडपणे युक्रेनच्‍या पाठीशी उभी आहे. त्‍यामुळे अमेरिकेचे हे मत महत्त्वाचे मानले जात आहे.

संपादकीय भूमिका

‘युक्रेन-रशिया युद्ध थांबावे’, असे अमेरिकाला मनापासून वाटते का ? हाच खरा प्रश्‍न आहे. हे युद्ध जितके दिवस चालेल तितके अमेरिकेला हवेच आहे. यातून रशियाला अनेक संकटांना सामोरे जावे लागेल आणि त्‍यामुळे अमेरिकेचा लाभ होईल, असाच अमेरिकेचा अंतस्‍थ हेतू आहे !