पुणे येथे २ महिला अधिकार्‍यांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न !

पुणे – येथील मध्यवस्तीमध्ये ४ जुलैला सायंकाळी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई करत असतांना एका मद्यपीने वाहतूक शाखेच्या महिला अधिकार्‍यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी एका मद्यपीवर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे अनर्थ टळला आहे. या घटनेत महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर आणि पोलीस हवालदार समीर सावंत हे दोघे घायाळ झाले आहेत. संजय साळवे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून अटक केली आहे. या प्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार समीर सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस संजय साळवे याला अडवून त्याची तपासणी करत त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करतांना त्याने पोलिसांच्या हातातील मशीन हिसकावून घेतले. हा प्रकार समजल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर त्याठिकाणी आल्या. काही समजण्याच्या आताच आरोपीने पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ जानकर आणि सावंत यांच्या अंगावर टाकला. त्यानंतर त्याने लाईटरने दोघांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

पोलिसांचे भय नसलेली जनता निर्माण होण्यास पोलीसच उत्तरदायी ! आतातरी पोलीस आपली प्रतिमा पालटण्यासाठी प्रयत्न करतील का ?