राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंदणी !

टोळी कार्यरत असण्याची शक्यता !

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – वाहनांचे चेसीस आणि इंजिन क्रमांक पालटून अन् बनावट कागदपत्रे सिद्ध करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंदणी झाली आहे. या प्रकरणी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला राज्य सरकारकडून दिलेल्या उत्तरामध्ये हा प्रकार उघड झाला आहे.

१. मुंबई येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जानेवारी २०२४ मध्ये ८६ वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झाल्याचे आढळून आले. नवी मुंबईतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये चेसीस आणि इंजिन क्रमांकामध्ये पालट करून वाहनांची नोंदणी करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

२. वसई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अरुणाचल प्रदेशातून महाराष्ट्रात आणण्यात आलेल्या ६० वाहनांचे चेसीस आणि इंजिन क्रमांक पालटून नोंदणी करण्यात आली आहे.

३. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये २३ वाहनांची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाली. अशा प्रकारे पुणे आणि नागपूर येथेही वाहनांची चुकीच्या पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे.

४. अनुमती न घेता महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणार्‍या अन्य राज्यांतील २२० खासगी वाहनांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वर्ष २०२४-२५ मध्ये कारवाई करण्यात आली आहे. या वाहनधारकांकडून २५ लाख ८२ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

५. बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेली काही वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रहित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

६. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहनांची नोंदणी पहाता राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनांची नोंदणी करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे, तसेच यामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.