महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा झाली आणि राज्यातील समस्त महिलावर्ग कागदपत्रांची जमवाजमव करू लागला. योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली असली, तरी आतापासूनच अर्ज घेण्यासाठी आणि भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. जन्मदिनांकाच्या सत्यतेसाठी जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडावा लागणार असल्याने अनेक विवाहित महिलांनी कागदपत्रांसाठी माहेरची वाट धरली आहे. नवीन सरकारी योजना चालू करण्यात आली की, काही पैशांच्या मोबदल्यात योजनेचे अर्ज भरून ते जमा करण्यास साहाय्य करणारा दलालवर्ग कार्यान्वित होतो, तसा या योजनेसाठीही तो कार्यरत झाला आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या स्मार्टफोनच्या द्वारेही भरता येऊ शकतो. याविषयी अनेकांना माहिती नसल्याने ‘सेतू केंद्रां’वर अर्ज भरण्यासाठी सध्या गर्दी होऊ लागली आहे. अर्जांची पडताळणी करण्यासाठी पुढील बराच काळ सरकारला द्यावा लागणार, हे जवळपास निश्चित आहे. अनेकांचे अर्ज बाद होऊ शकतात.
लोकसभा निवडणुकीतील अपयश भरून काढण्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. पुढील काही काळ सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भार पडणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. राज्यावर ७ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. थोडक्या कर्जासाठी शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. बेरोजगारीचा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे. अशा परिस्थितीत केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्याच्या तिजोरीवर भार टाकणे कितपत योग्य आहे ? असे मत अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते केवळ शहरातील नव्हे, तर आता ग्रामीण भागातील स्त्रियासुद्धा आर्थिकदृष्ट्या सबळ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आजच्या स्त्रीला सरकारकडून धनाची नव्हे, तर सुरक्षेची हमी हवी आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. आज कोणतेच क्षेत्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. लहान बालिकेपासून वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत वासनांध अत्याचार करत आहेत. पूर्वी शिक्षक, डॉक्टर, पोलीस, नातेवाईक ज्यांच्यावर कधीकाळी डोळे झाकून विश्वास ठेवला जात असे. आता ती स्थिती नाही. स्त्री अत्याचारांच्या प्रकरणांत न्याय मिळण्याचे प्रमाण अल्प आणि अपकीर्ती अधिक आहे. त्यामुळे सरकारसह पोलीस प्रशासनाने ‘त्यांच्या आर्थिक अडचणीसमवेत त्यांना सुरक्षेची हमी प्रदान करावी’, असे मत महिला विचारवंत व्यक्त करत आहेत. सर्वच ठिकाणच्या मुली, युवती, महिला आणि मुख्यत्वे हिंदूच असुरक्षित आहेत. त्यांना सक्षम आणि सुरक्षित वाटावे, असे वातावरण निर्माण करणेही तितकेच आवश्यक आहे.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.