उत्तर भारतात सामूहिक नामजप सत्संगासाठी विषय सादर करण्याच्या सेवेतून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे !

१. सौ. मंजुळा कपूर, देहली

१ अ. नियोजनकौशल्य आणि आत्मविश्वास वाढणे : ‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच मला ही सेवा प्राप्त झाली. माझ्या हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे मला बोलतांना अतिशय कठीण जात होते. माझा आत्मविश्वास उणावला होता; मात्र प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला ही सेवा करता आली. त्यामुळे मला माझा आत्मविश्वास परत मिळाला. माझ्यामध्ये नियोजनकौशल्य हा गुणही वाढला. विषय सादर करतांना मला पुष्कळ भीती वाटत असे; पण प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच मी या भीतीवर मात करू शकले. कृतज्ञता !’

२. श्री. हरिकिशन शर्मा, नोएडा

२ अ. विषयाचा अभ्यास करू लागल्यामुळे आत्मविश्वासाने विषय सादर करता येणे : ‘आधी मला विषय सादर करण्याची सेवा मला स्वीकारता येत नव्हती. कुणी मला ‘तुम्ही विषय सांगू शकता का ?’, असे विचारल्यावर मला पुष्कळ ताण येत असे आणि वाटायचे, ‘मी विषय सांगू शकत नाही, हे त्यांना चांगले ठाऊक असूनही ते मला जाणीवपूर्वकच विषयाबद्दल सांगत आहेत.’ पूर्वी माझा विषयाचा अभ्यास नसल्यामुळे कुठेही बोलतांना मला भीती वाटत असे. मला नामजप सत्संगात विषय सादर करण्याची सेवा मिळाली. त्यात केवळ ८ मिनिटांत विषय सादर करायचा असल्यामुळे मला ती सेवा स्वीकारता आली. त्या सेवेसाठी मी विषयाचा चांगला अभ्यास करू लागल्यामुळे त्या विषयासंदर्भात काही चर्चा होते तेव्हा मला तो विषय सांगण्याची संधी मिळते. त्यामुळे मी तो विषय आत्मविश्वासाने मांडू शकतो. माझ्या मनातील विषय सादर करण्याविषयीची नकारात्मकता जाऊन आता ३० मिनिटांपर्यंत विषय सादर करण्याची माझ्या मनाची सिद्धता झाली आहे. त्याचप्रमाणे या सेवेतून ‘विषय चांगल्या प्रकारे कसा सादर करायचा ?’, हेही मला शिकता आले.’

३. सौ. संजना सुनील गणोरकर, जबलपूर

३ अ. अभ्यासपूर्ण आणि इतरांचे साहाय्य घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होणे : ‘मला नामजप सत्संगात सेवा करायची संधी मिळाल्यावर मी सत्संगात बोलण्याचा अभ्यास करायला आरंभ केला. मी सत्संगाचा विषय समजून घेऊन तो स्वतःच्या शब्दांत लिहून काढायला आरंभ केला, तसेच ‘माझे काहीतरी चुकत आहे’, असे वाटल्यावर मी इतरांना विचारून घेऊ लागले. पूर्वी मला बोलतांना भीती वाटायची. आता माझ्याकडून प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी चांगली आणि परिपूर्ण सेवा करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

३ आ. उत्तरदायी साधकांकडून इतरांना साहाय्य करण्याचा गुण शिकता येणे : उत्तरदायी साधकांना माझी अडचण विचारल्यावर ते त्यांच्या सेवेत कितीही व्यस्त असले, तरी मला चांगल्या प्रकारे समजावून सांगून माझी अडचण सोडवत असत. ते पाहून मीही इतरांना साहाय्य करण्याचा गुण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आता मला ‘अन्य नवीन सेवाही शिकून घ्याव्या’, असे वाटते. यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

४. सौ. अश्विनी भणगे, नवी देहली

४ अ. आळशीपणावर मात करणे शक्य होणे : ‘गुरुदेवांच्या कृपेने मी २ दिवस ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगाची सेवा करू शकले. या सेवेमुळे ‘वक्तशीरपणा हा गुण जीवनात किती महत्त्वाचा आहे ?’, हे मला शिकता आले. ‘प्रत्येक कृती वेळेवर केल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ होऊन आपण गुरुदेवांची कृपा संपादन करू शकतो’, अशी मला अनुभूती आली. मी काही दिवसांपूर्वी सकाळी लवकर उठू शकत नव्हते; परंतु ही सेवा करायला लागल्यानंतर माझ्यात सेवेसाठी सकाळी लवकर उठण्याची तळमळ निर्माण झाली आणि मी काही दिवसांपासून सहजपणे सकाळी लवकर उठू शकत आहे. माझ्यात नियोजन करणे आणि वक्तशीरपणा हे गुण थोड्या प्रमाणात वाढले आहेत.

४ आ. राग अल्प होऊन घरातील सेवा वेळेवर होऊन आनंद मिळणे : सकाळी लवकर उठल्यामुळे घरातील सर्व सेवा वेळेत होतात आणि या सेवा करतांना मला आनंदही मिळत आहे. त्यामुळे आता माझी ‘कुटुंबियांनी मला घरकामात साहाय्य करावे’, अशी असलेली अपेक्षा उणावली आहे. त्यामुळे माझी चिडचिड न्यून झाली असून राग येण्याचे प्रमाणही उणावले आहे.’

५. श्री. गुलशनकुमार किंगर, फरिदाबाद, हरियाणा

५ अ. आळशीपणा दूर होणे : ‘मला सत्संग ऐकण्यासाठी लवकर उठायला जमत नव्हते; परंतु या सत्संगाची सेवा मिळाल्यापासून मला सकाळी लवकर उठायला जमू लागले आणि माझा आळसही न्यून झाला.

५ आ. अभ्यासू वृत्ती वाढणे : माझे एखाद्या विषयासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमांतून अभ्यास करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सत्संगाची सिद्धता चांगली होत असून त्यातून माझी शिकण्याची वृत्तीही वाढली. त्यासह माझ्यामध्ये अल्प कालावधीत सत्संगाची सिद्धता करण्याचा गुण निर्माण झाला.

५ इ. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : ही सेवा करण्यासाठी साधकांमध्ये श्री गुरूंचे रूप पहाता येऊन ‘साक्षात् श्री गुरुच मला ही सेवा करायला सांगत आहेत’, असे मला जाणवायचे. त्यामुळे मला ती सेवा स्वीकारता येऊन माझ्यामध्ये स्वीकारण्याची वृत्ती निर्माण झाली. ध्वनीमुद्रण (ऑडिओ) करतांना माझ्याकडून झालेल्या चुका साधकांनी सांगितल्यावर मला त्या चुका स्वीकारता येऊ लागल्या आणि त्या चुका सुधारतांना त्यामध्ये सर्वांना अपेक्षित असे पालटही करता येऊ लागले.

५ ई. भावाचे प्रयत्न वाढणे : विषय सादर करण्यासाठी भाव महत्त्वाचा असतो. हा भाव वाढवण्यासाठी ईश्वर किंवा गुरुदेव यांना प्रार्थना केल्यावर त्वरित साहाय्य मिळत असे.’

६. संहिता लिखाणाची सेवा करणार्‍या सौ. मातंगी तिवारी, इंदूर यांच्यामध्ये झालेले पालट

६ अ. या सेवेसाठी एकाच वेळी अनेक गोष्टींचे चिंतन करावे लागण्यामुळे अनेक गुण वाढण्यास साहाय्य होणे : ‘समाजातून मिळालेल्या प्रतिसादानुसार सूत्रसंचालनाच्या संहितेत वेळोवेळी पालट करावा लागत असल्यामुळे ‘संहिता अधिक चांगली कशी करता येईल ?’, असा विचार होऊ लागला. इतरांचे ऐकून घेणे, सहसाधकांना विचारून घेणे, इतरांना समजून घेणे, वेळोवेळी विषयात पालट करणे, परिस्थिती स्वीकारणे, विषयानुसार योग्य वक्ता निवडणे इत्यादी अनेक गोष्टींचे चिंतन करावे लागत असल्यामुळे हे गुण वाढण्यास साहाय्य झाले.

६ आ. अपेक्षा आणि अहं यांचे विचार अल्प होणे : पूर्वी साधकांकडून माझ्या पुष्कळ अपेक्षा असायच्या. या सेवेच्या माध्यमातून हा स्वभावदोष न्यून करण्यासाठी मला साहाय्य झाले. माझ्या मनात ‘मी सेवा चांगल्या प्रकारे करते’, असे ‘अहं’चे विचार असायचे. त्यामुळे सहसाधकांनी सुचवलेले पालट स्वीकारतांना माझ्या मनाचा संघर्ष होत होता; परंतु या सेवेच्या माध्यमातून माझा अहं, तसेच अपेक्षा करणे आणि पूर्वग्रह हे स्वभावदोष न्यून झाले.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक