Muslims In Agniveer Scheme : मुसलमान तरुणांनी ‘अग्निवीर’ बनून देशसेवा करावी ! – काझी साकीब अदीब

कानपूरमधील ३०० हून अधिक मशिदींमध्ये ‘अग्निवीर योजना’ मुसलमानांच्या हिताची असल्याचे प्रबोधन !

(काझी म्हणजे इस्लामी कायदेतज्ञ आणि न्यायाधीश)

कानपूर – मुसलमान समाजाने केंद्र सरकारच्या ‘अग्निवीर योजने’ला पाठिंबा दिला आहे. कानपूरमधील ३०० हून अधिक मशिदींमध्ये ‘अग्निवीर योजना’ देशातील मुसलमानांच्या हिताची असल्याची घोषणा करण्यात आली. ‘मुसलमान तरुणांनी अग्निवीर बनून देशासाठी बलीदान करण्यापासून मागे हटू नये. मुसलमान तरुणांनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा’, असे आवाहन काझी साकीब अदीब यांनी केले. नरामाऊ, राणीगंज, ओमपुरवा आणि कानपूर येथील मशिदींमध्ये शुक्रवार, ५ जुलैला झालेल्या नमाजानंतर उपस्थितांना ते संबोधित करत होते.

देशात मुसलमानांविषयी आदर वाढेल !

केंद्र सरकारची ही योजना सर्व जाती, समाज आणि वर्ग यांच्या भल्यासाठी आहे. या योजनेत सहभागी झाल्यास देशातील मुसलमानांचा मान वाढेल. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सुटेल. सैन्यात ४ वर्षांच्या सेवेनंतर स्वतःच्या आवडीचा कोणताही व्यवसाय करण्यासाठी पुरेसे पैसे असतील. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या विविध विभागांतही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असेही काझी साकीब अदीब यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

  • मशिदींमधून यापूर्वी कधीही भारतीय सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे ऐकिवात आले नव्हते, त्यामुळे ‘या आवाहनामागे कुठले षड्यंत्र आहे का ?’, असा संशय कुणाला आल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • पाकने वर्ष १९४८ मध्ये काश्मीरवर आक्रमण केल्यावर महाराजा हरि सिंह यांच्या सैन्यातील मुसलमान सैनिकांनी हरि सिंह यांच्याच विरोधात बंड करत पाकिस्तानी सैन्याशी हातमिळवणी केली होती, ही घटना विसरता येत नाही !