शेअर मार्केटच्या लोभाने ९ लाख ४८ सहस्र रुपयांची फसवणूक !

सातारा, ५ जुलै (वार्ता.) – शेअर मार्केटमध्ये चांगल्या परताव्याचे आमीष दाखवून ९ लाख ४८ सहस्र रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

संशयित सैफ अहमद नसरुद्दीन शेख आणि सहकारी यांनी संतोष शिंदे यांना ‘शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला लाभ मिळवून देऊ’, असे सांगितले. शिंदे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी पैसे गुंतवल्यावर कसा परतावा मिळतो, याचे एक पत्रही शिंदे यांना दाखवले, तसेच १०० रुपयांच्या ‘स्टँप पेपर’वर (मुद्रांक) नोटरी करारनामाही करून दिला. त्यामुळे तक्रारदार शिंदे यांनी त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी अशा अनेकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार सर्वांनी मिळून ९ लाख ४८ सहस्र रुपये गुंतवले; मात्र ठराविक कालावधी झाल्यानंतर तक्रारदार आणि इतरांनी पैसे परत मागितल्यावर संशयितांनी रक्कम परत देण्यास असमर्थता दर्शवली. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर शिंदे आणि इतर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका 

  • अशांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
  • लोभामुळे आमिषांना फसल्यानंतर फसवणूक होण्याची अनेक प्रकरणे समोर येत असूनही अशी प्रकरणे वारंवार घडतात, यातून फसवणूक करणार्‍यांवर प्रशासनाचा अंकुश नाही, हेच लक्षात येते.