…अन्यथा जनआंदोलन तीव्र करण्याची चेतावणी !
आळंदी (जिल्हा पुणे) – इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महाविकास आघाडीच्या वतीने इंद्रायणी नदीकाठी ‘इंद्रायणी बचाव एल्गार’ आंदोलन करण्यात आले. या वेळी शरदचंद्र पवार गट, ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस यांच्यासह विविध पर्यावरण प्रेमी संघटनांच्या पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभाग घेतला.
या वेळी ‘भाजप हटाव, इंद्रायणी बचाव’, अशी घोषणा करण्यात आली. सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारच्या निष्क्रिय भ्रष्ट कारभारामुळे पवित्र इंद्रायणी नदी आज प्रदूषित झाली असून ती मरणासन्न अवस्थेत पोचली आहे. ‘नमामी इंद्रायणी’च्या नावाखाली जनतेची दिशाभूल करणार्या सत्ताधार्यांनी आजवर पवित्र इंद्रायणीच्या नावाखाली केवळ भ्रष्ट कारभार केला आहे; पण यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असा रोष आंदोलकांनी व्यक्त केला आहे. इंद्रायणी नदीला पुनरुज्जीवित करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा येत्या काळात जनआंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी महाविकास आघाडीतील पदाधिकार्यांनी दिली आहे.