|
मुंबई – अंधेरीमध्ये पहाटे २ तरुणांना भरधाव वेगाने जाणार्या बोलेरो पिकअपने धडक दिली. यात विवेक यादव या तरुणाचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला, तर अमन यादव हा तरुण गंभीर घायाळ असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी पिकअपचा चालक पालटल्याचा गंभीर आरोप घायाळ तरुणाच्या वडिलांनी केला आहे. हा अपघात २९ जूनला झाला होता; मात्र पोलिसांनी ५ दिवसांनंतर आरोपी चालकाला अटक केली आहे. त्याचे नाव धनंजय राय (वय ३० वर्षे) असे आहे. ‘चालकाने दारूचे सेवन करत असल्याचे मान्य केले आहे; पण ५ दिवसांनी अटक केल्याने आरोपीने अपघाताच्या वेळी दारूचे सेवन केले होते का, हे कसे लक्षात येणार ?’, असा आरोपही तरुणाच्या वडिलांनी केला. चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने त्याचा शोध घेण्यात आला.