गाडीतून वाहतूक होत असलेल्या वासराचे मुंडके रस्त्यावर पडल्याचे आढळल्यानंतर रत्नागिरीतील नागरिक आक्रमक

  • गोवंशियांच्या हत्या रोखण्यात पोलीस निष्क्रीय रहात असल्याचा जमावाचा आरोप !

  • ठोस कारवाई न केल्यास मोठे आंदोलन करणार

  • पोलिसांना ४८ घंट्यांची मुदत    

सौजन्य: नवराष्ट्र

रत्नागिरी – शहराजवळील मिरजोळे भागातील मुख्य रस्त्याच्या उतारात वासराचे मुंडके आढळून आले. ४ जुलैच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी या घटनेची माहिती मनसेचे अमोल श्रीनाथ, पशूप्रेमी संध्या कोसुंबकर, गणेश गायकवाड यांना ही माहिती कळवली. त्यानंतर ही बातमी शहरात वेगाने पसरली. त्यानंतर गोरक्षक संस्था आणि गोप्रेमी नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रोष व्यक्त केला.
शहरात नियमित गोवंशियांच्या हत्या होत आहेत. गोरक्षक वेळोवेळी पोलिसांकडे ही माहिती देत आहेत; पोलीस मात्र निष्क्रीय रहात असल्याने पोलीस प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी व्यक्त करत जमाव आक्रमक झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर आणि अन्य पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ते जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

‘जोपर्यंत हे कृत्य करणार्‍या व्यक्तींना पोलीस अटक करत नाहीत, तोपर्यंत येथून वासराचे अवशेष येथून हालवू देणार नाही, आम्ही येथेच बसून राहू’, अशी भूमिका जमावाने घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस दलाची राखीव तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्या वेळी या तुकडीला जमावाला घेरण्याच्या सूचना दिल्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला. त्यामुळे  तुकडीला परत पाठवण्यात आले. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात जमावाने धडक दिली. रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दाखल झाले होते. ‘आम्हाला या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ४८ घंट्यांची मुदत द्या, आम्ही संबंधितांवर कठोर कारवाई करू’, असे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्यानंतर रात्री ३ वाजता जमाव माघारी फिरला.

अशा घटना वारंवार होणे, ही प्रशासनाची हार ! – अमोल श्रीनाथ, मनसे

ही घटना म्हणजे प्रशासनाची हार आहे. गोमांसाचा हा व्यापार केला जात आहे, हे कृत्य घृणास्पद आहे. याची लाज वाटली पाहिजे. पोलीस प्रशासनाशी अनेक वेळा पत्रव्यवहार करतोय. प्रत्येक वेळी ठोस पुरावा नसतो, असे म्हटले जाते, आता हा पुरावा घ्या आणि कारवाई करा !

नाहीतर भविष्यात मोठे आंदोलन करावे लागेल ! –  गणेश गायकवाड  

अशा घटनांविषयी पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागितली. आम्ही गोरक्षक म्हणूनही काम करत आहोत; मात्र आमच्यावरच गुन्हे नोंदवले जातात. सणवार येतात, तेव्हा ‘तुम्ही संयमाने घ्या, कायदा हातात घेऊ नका.’, असा सल्ला केवळ आम्हालाच दिला जातो. आम्ही कायदा हातात घेत नाही; पण पोलीस प्रशासन तरी काय करत आहे? त्यांचे कर्तव्य त्यांनी केले असते, तर आज ही घटना घडली नसती. आतातरी कारवाई करावी, नाहीतर भविष्यात मोठे आंदोलन करावे लागेल. आमच्या भावनांचा उद्रेक झाला, तर प्रशासनाला जड पडेल.

आम्हाला आता कायदा हातात घ्यायला लावू नका! – पशूप्रेमी संध्या कोसुंबकर

ही केवळ एक घटना नाही, अशा घटना वारंवार घडत आहेत. अशी कृत्ये करणारी टोळी आहे. त्याचे हे काम आहे. आम्ही पोलिसांकडे गेल्यानंतर आम्हालाच गप्प केले जाते. आता हा पुरावा घ्या. ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ आम्हाला आता कायदा हातात घ्यायला लावू नका !

संपादकीय भूमिका

राज्यात गोहत्याबंदी असतांना पोलीस निष्क्रीय रहातात, हे नित्याचेच झाले आहे. यामुळेच गोरक्षकांना गोहत्याबंदीसाठी रस्त्यावर उतरून प्राणपणाला लावून कार्य करावे लागते. याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे !