Bridge Collapsed Bihar : बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला

१५ दिवसांतील दहावी घटना

सारण (बिहार) – येथे ४ जुलैला सकाळी गंडकी नदीवरील एक पूल कोसळला. हा पूल १५ वर्षांपूर्वी स्थानिकांनी वैयक्तिक निधीतून बांधल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पूल कोसळण्याचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. गेल्या पंधरवड्यात राज्यात पूल कोसळण्याची ही दहावी घटना आहे. गेल्या २४ तासांत सारणमधील पूल कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. ३ जुलैला सारण जिल्ह्यातील जनता बाजार परिसरात आणि लहलादपूर परिसरात २ छोटे पूल कोसळले होते. वारंवार पूल कोसळण्याच्या घटनांनमागची कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आल आहे, अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी अमन समीर यांनी दिली.

बिहार सरकारला पुलांच्या बांधकामाचे परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. अधिवक्ता ब्रजेश सिंग यांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकामध्ये उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यासमवेतच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मापदंडानुसार पुलांवर देखरेख ठेवण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटिशांनी बांधलेले पूल १०० वर्षांनंतरही चांगल्या स्थिती रहातात, तर स्वातंत्र्यानंतर बांधण्यात आलेले पूल १० वर्षेही टिकत नाहीत, हे भारतियांना आणि सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !