कॅनडामध्ये पुन्हा खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयासमोर काढली फेरी !  

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तिरंग्याचा केला अवमान !

ओटावा (कॅनडा) – कॅनडात पुन्हा एकदा खलिस्तानच्या समर्थनार्थ फेरी काढण्यात आली. यात भारतविरोधी घोषणाबाजी करत तिरंग्याचा अवमान करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करण्यात आली. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर ही फेरी काढण्यात आली. या वेळी भारत सरकारवर आरोप करत कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची मागणी केली.

या वर्षी मार्चमध्ये भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा एडमंटनमधील ‘इंडो-कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स’च्या कार्यक्रमात बोलत असतांना शेकडो खलिस्तान समर्थक निदर्शकांनी अपमानास्पद घोषणाबाजी केली होती. याआधी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी खलिस्तान समर्थकांनी कॅनडातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेकवेळा भारतविरोधी निदर्शने केली आहेत.

संपादकीय भूमिका

कॅनडातील खलिस्तान्यांना धडा शिकवण्यासाठी कॅनडातील नागरिकांनीच आता प्रयत्न केले पाहिजेत !