घोडेगाव (पुणे) – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण यात्रेच्या काळात वाहनतळ आणि देवदर्शनाला येणार्या भाविकांची लूट थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी प्रयत्न करावेत. एस्.टी. महामंडळाने ‘मिनी बस’ची (लहान गाडी) संख्या वाढवून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, असे आदेश प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले. ते घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयात श्रावण महिन्यातील भीमाशंकर यात्रा आढावा बैठकीमध्ये बोलत होते. त्या वेळी शासकीय अधिकार्यांसोबत विश्वस्त उपस्थित होते.
श्रावण महिन्यात आपत्कालीन कक्ष, सर्व विभाग प्रमुखांनी दक्ष रहावे, वाहनतळामध्ये पाणी, स्वच्छतागृह, वीज, रुग्णवाहिका, आरोग्य सुविधा, क्रेन आदींची व्यवस्था करावी. अन्न आणि औषध प्रशासनाकडून भीमाशंकरमधील पेढे दुकानदार अन् उपाहारगृहांमधील अन्नपदार्थांची पडताळणी करावी. वाहनतळांवर आवश्यक त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात मुरूम टाकावा. भीमाशंकर मंदिराकडे जाणार्या पायरी मार्गाचे काम चालू असल्याने सध्या छोट्या रस्त्याने भाविकांना मंदिराकडे जावे लागते. हा पायरी मार्ग लवकर चालू करावा, अशी मागणी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली.
‘व्ही.आय.पी.’ (महत्त्वाच्या व्यक्ती) दर्शनाच्या नावाखाली अनेक गाड्या येतात. त्या गाड्यांना थेट मंदिरापर्यंत सोडल्यानंतर वाहनतळांवरील इतर भाविक पोलीस प्रशासनासह वाद घालतात. त्यामुळे ‘व्ही.आय.पी.’ दर्शनांवर निर्बंध घालावेत. त्यांच्या गाड्या वाहनतळांवर थांबवाव्यात आणि इतर वाहनांनी त्यांना मंदिरापर्यंत न्यावे, अशी मागणीही विश्वस्तांनी केली.