संपादकीय : पालथ्या घड्यावर पाणी !

हाथरस येथील दुर्दैवी घटना

प्रसंगांतून काहीही धडा न घेणे, हा आपली सरकारे आणि सरकारी यंत्रणा यांचा अंगभूत गुणधर्म आहे. कुठलाही अनिष्ट प्रसंग घडून गेल्यावर यंत्रणा धावाधाव करतात. त्या वेळी अधिकार्‍यांच्या घटनास्थळी भेटी, पीडितांच्या भेटी, मृतांना श्रद्धांजली, हानीभरपाईची घोषणा, पत्रकार परिषदा, चौकशी पथकांची स्थापना आणि एखाद-दुसर्‍या कनिष्ठ अधिकार्‍याचे निलंबन, अशी सरकारची साचेबद्ध कार्यशैली असते. हीच ‘कठोर’ कारवाईसुद्धा असते अन् उपाययोजनासुद्धा ! घडलेला प्रसंग आठवडाभरात जनतेच्या विस्मृतीत गेला की, पुन्हा सरकारी यंत्रणांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी !’ उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने पुन्हा एकदा हेच अधोरेखित केले आहे. हाथरस येथील रतीभानपूरमधील फुलराई गावात भोलेबाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतरसुद्धा वरीलप्रमाणेच सरकारी सोपस्कार पार पाडला जाईल, यात तीळमात्र शंका नाही. अशी घटना घडली की, त्याचे दायित्व स्वीकारण्याऐवजी सरकारी यंत्रणा त्याचे खापर जनतेवर फोडून मोकळ्या होतात; पण स्वतःच्या उणिवा आणि चुका यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

आपल्याकडे ‘गर्दीचे व्यवस्थापन’ नावाचा प्रकार अस्तित्वात आहे कि नाही ?, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. विदेशात ‘कुठली आपत्कालीन घटना घडल्यास जनतेचे वर्तन कसे असावे ?’, याची शिकवण प्रत्येक नागरिकाला दिली जाते. त्यामुळे सर्व जण शिस्तबद्ध पद्धतीने इतरांना त्रास होऊ न देता स्वतःची सुटका करून घेतात. याची अनेक उदाहरणे आपण ऐकली, पाहिली आणि वाचली असतील. गर्दीला गती आणि बळ दोन्हीही असते. एकदा का गर्दी वहाती झाली किंवा अनियंत्रित झाली की, लोकांचा लोंढा वाटेत येईल त्याला पार करत पुढे जातो. त्यात अफवा पसरून परिस्थिती अधिक बिकट होते. अशा वेळी जगातील कुठलेही आपत्ती व्यवस्थापन ही परिस्थिती सक्षमपणे हाताळू शकत नाही. त्यासाठी पूर्वनियोजन असणे आवश्यक आहे. ते नसणे, हीच आपल्या सरकारी यंत्रणांची मोठी उणीव आहे. बहुतेक यात्रांमध्ये तात्पुरते तंबू, पत्र्याचे शेड, दुकाने, खाद्यपदार्थांसाठी गॅस सिलिंडर, कढया वगैरे गोष्टींची भाऊगर्दी असते. त्यातून शेष राहिलेली जागा भाविकांना ये-जा करण्यासाठी उरते. मग अशात गर्दी उसळून ती अनियंत्रित झाली की, चेंगराचेंगरी होते. हाथरस येथील परिस्थिती थोडी वेगळी होती. तेथे भोलेबाबा यांचा सत्संग संपल्यानंतर ते मोटारीत बसून निघून गेल्यानंतर तेथील माती घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आणि मग चेंगराचेंगरी होऊन १२० हून अधिक भाविकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. आताही याचे खापर भाविक आणि भोलेबाबा यांच्यावर फोडले जाते कि नाही बघा !

 हिंदु धर्मावर खापर फोडू नका !

यापूर्वी महाराष्ट्रातील मांढरदेवी, केरळमधील शबरीमला आदी ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविक गतप्राण झाले आहेत. अशा समस्येवर प्रशासनाचे उपायच भयंकर असतात. मांढरदेवी येथील दुर्घटनेच्या प्रकरणात प्रशासनाने समस्येच्या मुळाशी न जाता तेथील हिंदूंच्या प्रथेवरच थेट बंदी घातली ! याला उपाययोजना म्हणायचे कि गळचेपी ? हे पहाता हाथरस प्रकरणावर ‘उपाय’ म्हणून धार्मिक कार्यक्रमातील भाविकांच्या संख्येवरच नियंत्रण आणण्याचा कदाचित् नवा नियम करण्यासही प्रशासन मागे-पुढे बघणार नाही. तथापि हेच प्रशासन अशा ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे, अतिक्रमणे हटवणे, रांगांची योग्य व्यवस्था करणे आदींविषयी मात्र ‘ब्र’ही काढणार नाही.

एका आकडेवारीनुसार गेल्या ४० वर्षांत जगभरात चेंगराचेंगरीमध्ये ७ सहस्रांहून अधिक व्यक्ती मरण पावल्या, तर १४ सहस्रांहून अधिक घायाळ झाल्या. अशा एकूण २१३ घटनांपैकी ४९ घटना स्टेडियममध्ये, २५ घटना ऑर्केस्ट्राच्या (गाण्याच्या) कार्यक्रमांत, ३८ राजकीय मेळाव्यांत, तर ४१ घटना धार्मिक कार्यक्रमांत घडल्या आहेत. उरलेल्या ६० घटना कसलेही सकृत कारण नसतांना घडलेल्या आहेत. मग म्हणून कुणी स्टेडियम कायमचेच बंद केले, ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम किंवा राजकीय मेळावे आदींवर बंदी आणली, अशा गोष्टी चेंगराचेंगरीच्या घटनेवरील ‘उपाय’ म्हणून केलेल्या नाहीत. गेल्या ३० वर्षांत एकट्या हज येथे ३ सहस्रांहून अधिक व्यक्ती भीषण गर्दीत मीना व्हॅलीमध्ये मरण पावल्या; पण म्हणून तेथील सरकार आणि प्रशासन यांनी हज यात्रेवर बंदी आणली नाही कि त्यावर निर्बंधही लादले नाहीत. जगभरात सर्वाधिक व्यक्तींचा मृत्यू हा जत्रा, धार्मिक यात्रा, मेळे अशा ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरींमध्ये झाला, हे सत्य आहे; पण म्हणून त्यावर बंदी आणणे योग्य नाही. अशा घटना रोखण्यासाठी अन्य देशांत उपाययोजना काढल्या जातात, तर आपल्याकडे निर्बंध लादले जातात ! याचा अपलाभ उठवत पुरोगामी नावाची वाळवी हिंदु धर्म आणखी पोखरण्यासाठी पुढे सरसावते. निधर्मी प्रसारमाध्यमे ‘हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये बघा कशी नेहमीच चेंगराचेंगरी होते’, असे २४ घंटे दाखवतात. ही मंडळी हिंदूंच्या प्रथा-परंपरांना ‘मागास’, तर सश्रद्ध हिंदु भाविकांना ‘खलनायक’ ठरवतात; म्हणूच ‘अशा घटनांमागे कुठले षड्यंत्र आहे का ?’, हेही पडताळायला हवे. हाथरस प्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘या घटनेमागे षड्यंत्र आहे का ?’, याची चौकशी केली जाण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे लगेचच कुणाला दोषी ठरवणे घाईचे ठरेल.

 ‘या’ उपाययोजना हव्यात !

मध्यंतरी एका आस्थापनाने विवाहित महिलांची भरती करण्यास नकार दिला होता; कारण त्यांच्याकडे काम करणार्‍या महिलांना धातूचे दागिने परिधान न करण्याची अट होती. यावरून एका हिंदुद्वेषी आणि सडक्या विचारांच्या वृत्तपत्राने हिंदु महिलांचे ‘कामापुढे मंगळसूत्र किती गौण आहे ? आणि ते काढणे का आवश्यक आहे ?’, यांविषयी ‘प्रबोधन’ केले. एरव्ही भांडवलशाहीच्या विरोधात असलेले आणि ‘कुणी काय घालावे आणि काय घालू नये, यांवर निर्बंध म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी’, अशी भूमिका असलेल्या या वृत्तपत्राने या प्रकरणात हिंदूंच्या व्यक्तीस्वातंत्र्याकडे दुर्लक्ष केले ! असेच हाथरससारख्या प्रकरणांत घडत असते. तेव्हा सावधानता बाळगणे अधिक आवश्यक आहे. तात्पर्य हेच की, चेंगराचेंगरीसारख्या संवेदनशील घटनांचे खापर हिंदूंच्या प्रथांवर फोडणे, म्हणजे ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’, यातला प्रकार आहे. अशा घटना टाळण्यासाठी सरकारने नागरिकांना गर्दीत वावरण्याचे प्रशिक्षण देणे, प्रशासनाने सर्व प्रशासकीय व्यवस्था चोख ठेवणे, आयोजकांनी वेळोवेळी आवश्यक त्या पूर्वसूचना देऊन सर्व दक्षता घेणे, तर भाविकांनी सजग रहाणे आवश्यक आहे !

चेंगराचेंगरीसारख्या घटनांना गर्दीच्या व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेली सरकारी व्यवस्थाच उत्तरदायी आहे !