India China : चीनकडून भारतीय सीमेवर अनिश्‍चित काळासाठी मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात !

अमेरिकेच्या अहवालातून माहिती उघड

न्यूयॉर्क (अमेरिका) – रशिया-युक्रेन युद्ध, तसेच इस्रायल-हमास युद्ध, हे जरी चर्चेचे विषय असले, तरी दक्षिण चीन समुद्रातील वाढता तणाव आणि चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ भारताच्या सीमेवर स्वतःची स्थिती सतत सशक्त करत असण्याकडेही दुर्लक्षून चालणार नाही. ‘यू.एस्. इंटेलिजन्स कम्युनिटी’च्या अहवालात याविषयी माहिती देण्यात आली असून त्यामध्ये वार्षिक धोक्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यात चीन आणि भारत यांच्यातील सीमा तणावाला जगातील इतर सर्व संघर्ष, धमक्या आणि तणाव, यांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे. ‘सीमा तणावामुळेच उभय देशांमधील संबंध ताणलेले रहातील’, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. जून २०२० मधील गलवान संघर्ष सोडला, तर दोन्ही देशांच्या सीमेवर कोणतीही मोठी चकमक झालेली नाही. असे असले, तरी चीनने अनिश्‍चित काळासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एप्रिल २०२४ मध्ये ‘यू.एस्. आर्मी वॉर कॉलेज’च्या ‘स्ट्रॅटेजिक स्टडीज इन्स्टिट्यूट’ने वर्ष २०२०-२१ मध्ये अक्साई चीनमधील पर्वतीय सीमेवर असलेल्या चिनी सैन्याच्या हालचालींच्या सखोल तपासणीचा अहवाल प्रकाशित केला. अहवालाचे प्रमुख लेखक डेनिस ब्लास्को हे बीजिंग आणि हाँगकाँग यांच्यातील अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी म्हटले की, अक्साई चीन प्रदेशातून सैन्य मागे घेण्यासाठी चीन भारतीय सैन्य आणि सरकार यांच्याशी चर्चा करत असला, तरी तो अक्साई चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि डोकलामच्या सीमेवर त्याचे सैन्य अनिश्‍चित काळासाठी तैनात ठेवणार आहे.

संपादकीय भूमिका

  • जून २०२० मध्ये भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना अद्दल घडवल्याने धास्तावलेल्या चीनने सैनिक तैनात करणे, यात आश्‍चर्य नाही ! असे असले, तरी भारताने सातत्याने स्वत:ची युद्धसज्जता आणि क्षमता यांत वृद्धी करत रहाणे अत्यावश्यक आहे !
  • भारताच्या शेजारी असलेल्या शत्रूदेशाची जी माहिती सातासमुद्रापलीकडे असणार्‍या अमेरिकेला मिळते, ती भारताला कशी मिळत नाही ?