‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’वर अर्ज करता येणार ! – अदिती तटकरे, महिला आणि बालविकास, मंत्री

मुंबई, २ जुलै (वार्ता.) – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या कार्यवाही करावी. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी’, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. २ जुलैपासून ‘नारी शक्ती दूत ॲप’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ आवेदन करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात १ जुलै या दिवशी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलतांना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे. यानंतर ही प्रक्रिया निरंतर चालू रहाणार आहे; मात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या साहाय्याने आवेदन करू शकतात. यानंतर या प्रतिनिधींनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने आवेदन शासनास सादर करावेत.

त्या म्हणाल्या की, ज्या पात्र महिला स्वत: ‘ऑनलाईन’ पद्धतीने आवेदन सादर करू शकतात, त्या सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. यासाठी गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असल्यास करावे. जिल्हापातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते चालू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात.